इचलकरंजी/प्रतिनिधी -यंत्रमाग कामगारांच्या मजूरीवाढ संदर्भात सर्व समावेशक संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्र्न मार्गी लावून कामगारांना न्याय द्यावा. तसेच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करून कार्यवाही सुरू करावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर यंत्रमागधारकांची बंद झालेली वीज सवलत सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले.
सन 2013 मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीतील करारानुसार सहाय्यक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीची घोषणा होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. या संदर्भात संघटनेच्यावतीने आमदार आवाडे यांना निवेदन दिले होते. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार रविवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे प्रतिनिधी व ताराराणी पक्षाचे पदाधिकारी यांनी कागल येथे नामदार मुश्रीफ यांची निवासस्थानी भेट घेतली.
आमदार आवाडे यांनी कामगारांच्या मजुरीवाढ प्रश्र्नी सविस्तर माहिती देताना वस्त्रोद्योगातील सद्य स्थितीची माहिती विषद केली. मजुरीवाढ प्रश्र्नि यंत्रमागधारक संघटना, कामगार संघटना, व्यापारी, संबंधित शासकीय अधिकारी व विविध राजकीय पक्षाची मंडळी यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. त्याचबरोबर जाहीर केलेप्रमाणे यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून कामगारांना न्याय व त्यांचे हक्क द्यावेत अशीही मागणी केली.२७ अश्वशक्ती वरील व २७ अश्वशक्ती खालील यंत्रमागासाठीच वीज सवलत महावितरणने देण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे वीज बिले दुप्पट दराने ये असल्याने यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला असून तो बंद पडण्याची भीती आहे. आपण ज्येष्ठ मंत्री असून वस्त्रोद्योगाची चाके थांबली तर सर्वच ठप्प होईल. म्हणून आपण या प्रश्र्नी शासनाकडे पाठपुरावा करावा असे सांगितले.
नामदार हसन मुश्रीफ यांनी, सकारात्मक प्रतिसाद देत मजुरीवाढ संदर्भात लवकरच बैठक घेण्यासह कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. तर वीज सवलटबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
शिष्टमंडळात ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे दत्ता माने, शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, बंडोपंत सातपुते, राजेंद्र निकम, सुनिल बारवाड, हणमंत लोहार, रियाज जमादार यांचा समावेश होता.
Posted inकोल्हापूर
यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून कार्यवाही सुरू करावी – आमदार प्रकाश आवाडे
