⭕️8 मार्च रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे दिले निमंत्रण
रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी
कोकणातील नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. रिफायनरी विरोधी संघटना (बारसु- सोलगाव पंचक्रोशी) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
कोकण हे ऑक्सिजनचे भांडार असून तेथे रासायनिक उद्योग येऊ नयेत, अशी भूमिका ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच मांडली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जोशी, अनिल गोर्ले, दिलीप बोळे, सत्यजीत चव्हाण, अविनाश उषा वसंत यांनी कोकणात रिफायनरी नको याची मांडणी केली.
नाणारचा प्रकल्प रद्द करून तो आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू – सोलगाव पंचक्रोशीत उभारला जाणार आहे. मात्र या दोन्ही गावातील मुंबईनिवासी ग्रामस्थांनी या प्रस्तावित प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवत आता ऐन अधिवेशन काळात म्हणजेच मंगळवार ८ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे संघटनेच्यावतीने adv. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रणही देण्यात आले.
तसेच मंगळवार ८ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आझाद मैदानात हे धरणे आंदोलन केलेजाणार आहे. तरी बारसू आणि सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबासह या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रिफायनरी विरोधी संघटना (बारसू- सोलगाव पंचक्रोशी) मुंबई यांनी केले आहे.