⭕ तातडीने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी
⭕ ‘या’ रस्त्याच्या बाजूची झाडे तोडण्याची वाहनाचालकांकडून होतेय मागणी
रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी
रत्नागिरीकडे जाणाऱ्या महत्वाच्या मार्गावरून एक युवक दुचाकीवरून जात असताना अचानक चालू दुचाकीवर बिबट्याने झडप घातली. सुदैवाने मोटार चालक बिबट्याच्या हल्ल्यातून बजावला. हि भयानक घटना पानवळ नजीक चांदसूर्या येथे गुरुवारी रात्री ८ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली.
तालुक्यात बिबट्याचा वावर ही नवीन गोष्ट नाही. वाडी वस्तीच्या आजूबाजूस जंगल परिसर असल्याने या ठिकाणी अनेकदा जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यांना भक्ष्य मिळत नसल्याने ते रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर झडप घालतात. यापूर्वी बिबट्याच्या हल्यात जखमी करण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय वाडी वस्तीतील बकऱ्या, गुरे, कुत्री यांची देखील बिबट्याने शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
जकादेवी येथील रहिवासी सचिन बेंद्रे कामानिमित्त रत्नागिरीत आले होते. सर्व कामं आटपून रात्री उशिरा घरी परतत असताना पानवळ नजीक चांदसूर्या रस्त्याच्या बाजूलाच झाडा-झुडपातत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. या जीवघेण्या हल्ल्यात सचिन बेंद्रे सुदैवाने बजावले. अचानक झाडा झुडपाआडून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुचाकी चालक सचिन बेंद्रे सह सर्वांची चांगलीच भंबेरी उडाली होती. लोकांचा जमाव आल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यानंतर बेंद्रेसह इतर सर्वजण घरी निघून गेले.
‘या’ रस्त्याच्या बाजूची झाडे तोडण्याची वाहनाचालकांकडून मागणी
हातखंबा ते खेडशी या भागातील रस्त्याच्या आजूबाजूला झाडांचीच गर्दी असल्यामुळे कोणताही प्राणी रस्त्यावर आला तर त्याचा अंदाज येत नाही. रस्त्यांच्या बाजूची झाडे तोडावी अशी वाहनचालकांकडून प्रसार माध्यमांद्वारे मागणी करून देखील संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. मात्र या घटनेने भीतीचे वातावरण पसरले असल्याने तातडीने या भागातील रस्त्यांच्या बाजूची झाडे तोडावी अशी मागणी हि वाहनचालक करत आहे.
तातडीने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा
या परिसरात आठ दिवसांपूर्वी हि बिबट्याचे दर्शन झाल्याने त्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने त्वरीत पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.