राज्यातील उद्योगांंना चालना देण्यासाठी नवीन विमानतळे आणि विमानतळांचा विस्तार हा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नवीन विमानतळांमुळे वाहतुकीचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. विमान वाहतुकीच्या जाळ्याने महाराष्ट्र देश-विदेशाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे.
चिपी येथे विमानतळ बांधल्यानंतर आता शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली येथेही विमानतळ बांधण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील वाहतुकीला चालना मिळू शकेल.
अजित पवार म्हणाले की, शिर्डी विमानतळावरून मालवाहतूक आणि रात्रीची वाहतूक सुरू होणार असून त्यासाठी १५० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळाच्या विकास कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि भूसंपादनासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची घोषणा पवारांनी केली. तर, अमरावती विमानतळावरून रात्रीची उड्डाणे, नवीन टर्मिनलची उभारणी आणि धावपट्टीचे रुंदीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.