राजापूर ; अधिवेशन संपताच जामदा प्रकल्पाच्या रखडलेल्या पुनर्वसनाबाबत बैठक मंत्रालयात आयोजित करू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार राजन साळवी यांना दिले, अशी माहिती आमदार साळवी यांच्या कार्यालयीन सूत्रांकडून देण्यात आली. मंत्र्यांच्या आश्वासनाची माहिती शिवसेना पदाधिकार्यांकडून उपोषणकर्त्यांना दिली. त्यामुळे जामदा प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांकडून काजिर्डा येथे पाच दिवसांपासून सुरु असलेले उपोषण स्थगित केले. काही वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व परिसरात काजिर्डा येथे जामदा प्रकल्पाचे काम स्थानिक जनतेला विश्वासात न घेता त्यांच्या जमिनीमध्ये सुरु असल्याने प्रकल्पाविरोधात वातावरण पसरले आहे. प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी काजिर्डा या प्रकल्पस्थळी उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आमदार राजन साळवी यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन जामदाच्या पुनर्वसनाबाबत त्यांच्या दालनात सुरु असलेल्या अधिवेशन काळात एक संयुक्त बैठक आयोजित करावी, अशा मागणीचे निवेदन दिले होते. त्याची दखल जलसंपदामंत्र्यांनी घेतली. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच जामदा प्रकल्पाबाबत खास बैठक आयोजित करण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. लेखी आश्वासनाची माहिती दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगितकेले.
Posted inरत्नागिरी
रत्नागिरी : काजिर्डा येथे पाच दिवसांपासून सुरु असलेले उपोषण स्थगित
