रत्नागिरी : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळ आज दुपारी १२.३५ वाजता झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील महिला सुमित्रा सोनू कोत्रे, (६२) जागीच ठार झाल्या. दुचाकी चालवणारा त्यांचा मुलगा दीपक सोनू कोत्रे, (२९) गंभीर जखमी आहे.
अपघाताची माहिती अशी- महामार्गावर हातखंबा दर्ग्याजवळील तीव्र उतारावर हा अपघात झाला. तिनही वाहने रत्नागिरीच्या दिशेने चालली होती. पुढे एसटी बस (एमएच १४ एसटी २४०८) होती. ती पलूस वरून आली होती व रत्नागिरीला चालली होती. तिच्या मागे ऍक्टिवा दुचाकी (एमएच ०८ ए एल १२९९ ) होती. त्याच्यामागे साखर भरलेला ट्रक (केए २२ दि २५५५) चालला होता. या ट्रकने मागून दुचाकीला (ॲक्टिवा) ठोकरले. ही दुचाकी एसटीला पुढे जाऊन आदळली. त्यामध्ये मुलासोबत बसलेली त्याची आई ठार झाली. व मुलगा जखमी झाला आहे. त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथे महामार्गावर २४ तास कार्यरत असणाऱ्या मोफत ॲम्बुलन्ससेवेने तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल केले.
हातखंबा येथे हा अपघातग्रस्त पॉईंट असल्याने येथे भलेमोठे स्पीड ब्रेकर घालून ठेवले आहेत. परंतु वाहनचालकांचा वेग एवढा असतो की ते स्पीड ब्रेकरलाही दाद देत नाहीत. त्यातून दुचाकी वाहनांना स्पीड ब्रेकर हे अपघातासाठी धोकादायकच ठरू शकतात. त्यातून असे अपघात होतात.