संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाने संगमेश्वरच्या दुतर्फा वेग घेतला आहे . आरवली , संगमेश्वर , ओझरखोल येथील पुलांची कामे ठप्प असली तरीही चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे . सध्या आरवली ते संगमेश्वरच्या दरम्यान वेगाने काम सुरु असतांना संगमेश्वर नजिकच्या धामणी या गावात चक्क नदीत भराव टाकून रस्ता केला जात असल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा ऱ्हास असे विदारक दृष्य धामणी ते आंबेड खुर्द या गावा दरम्यान असणाऱ्या नदीत पहायला मिळत आहे . राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संगमेश्वरच्या तहसीलदारांनी पहाणी करुन याबाबत कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी पर्शुराम पवार यांनी केली आहे .
धामणी गावा जवळ एका बाजूला रेल्वे मार्ग आणि दुसऱ्या बाजूला महामार्ग अशी स्थिती आहे . नदी बाजूला असल्याने महामार्गाचे रुंदीकरण करतांना प्रथम चक्क नदीच्या काही भागात भराव घालण्यात आला . काही कालावधी नंतर या भरावाला संरक्षक भिंत बांधण्याचे काम ठेकेदार कंपनी कडून हाती घेण्यात आले आहे . ही संरक्षक भिंत म्हणजे खरेच एक आश्चर्य असून अभियंत्यांनी यामध्ये तांत्रिक बाबी तपासल्या का ? असा प्रश्न हे काम पाहिल्यानंतर पडतो . संरक्षक भिंत बांधताना काढण्यात आलेली माती थेट नदीत टाकण्यात आली आहे . मूळातच येथे नदी गाळाने भरलेली असतांना , हा गाळ काढण्याचे काम राहीले बाजूलाच मात्र नदीत आणखी भराव टाकून नदीचे अस्तित्वच संपविण्याचा प्रकार महामार्ग विभागाकडून सुरु आहे .
धामणी आणि आंबेड खुर्द या दोन्ही गावात साधारण एक किलो मिटरच्या परिसरात नदीचे अस्तित्वच संपविण्याचा घाट घातला जात आहे . चौपदरीकरणाचे काम थेट नदीत सुरु असतांना अनेक ठिकाणी नदीत मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत . नदी लगत ठेवलेले मातीचे ढीग पावसाळ्यात नदीत जावून नदी आणखी गाळाने भरणार आहे . धामणी येथे नदी मध्ये भराव टाकण्या ऐवजी जर पिलर्स टाकले असते , तर नदीचे अस्तित्व कायम राहीले असते आणि कामाचा दर्जाही राखला गेला असता असे मत व्यक्त केले जात आहे . एकूणच सारे काम मनमानी पध्दतीने सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने धामणी आणि आंबेडखुर्द गावच्या ग्रामपंचायतींनी नदीत भराव टाकून केले जाणारे काम रोखावे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला नोटीस द्यावी अशी मागणी देखील पर्शुराम पवार यांनी केली आहे .
काम थांबविण्यात यावे
संगमेश्वर तालुक्यातील नद्यांमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ उपसण्यात यावा अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांसह व्यापारी बांधवांकडून केली जात आहे . संगमेश्वर येथील शास्त्री – सोनवी नदीतील गाळ काही वर्षांपूर्वी काढण्यात आला होता . वांद्री – उक्षी परिसरातील ग्रामस्थ बावनदीतील गाळ उपसावा यासाठी थेट आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत . अशा स्थितीत धामणी ते आंबेड या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करतांना नदीत भराव टाकून रस्त्याचे सुरु असणारे काम तहसीलदार यांनी स्वतः पहावे आणि संबधितांवर कठोर कारवाई करावी . सदरचे काम तत्काळ थांबविण्यात यावे आणि यासाठी अन्य पर्याय शोधावा . असे न केल्यास आपण जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते पर्शुराम पवार यांनी सामना जवळ बोलतांना सांगितले .