आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा जास्त वाढली महागाई ; खाद्य पदार्थांच्या किंमतीसह इतर वस्तूमधे मोठी वाढ
फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर पोचला 6.07% वर
नवी दिल्ली : भारतातील किरकोळ महागाई, ग्राहक किंमत निर्देशांकानुसार फेब्रुवारी महिन्यात 6.07 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. किरकोळ महागाईन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) लक्ष्याच्या वरच्या मर्यादेच्या पलीकडे गेली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने यासंदर्भातील जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. आरबीआयला सरकारने दोन्ही बाजूंनी 2 टक्क्यांच्या फरकाने किरकोळ महागाई 4 टक्क्यांवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महागाई 8 महिन्यांच्या उच्चांकीवर
तेल आणि स्निग्ध पदार्थांच्या किमतीत 16 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई 8 महिन्यांच्या उच्चांकावर पोचली. त्यानंतर फुटवेअरमध्ये 10.10 टक्क्यांनी आणि इंधन आणि प्रकाशाच्या किमतीत 8.73 टक्क्यांनी वाढ झाली, असे आकडेवारीतून दिसते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई जानेवारी 2022 मध्ये 6.01 टक्के आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 5.03 टक्के होती.
खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ
आज सरकारने सांगितले की खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये चांगलीच वाढ झाल्यामुळे फेब्रुवारीमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 13.11 टक्क्यांनी वाढली. एप्रिल 2021 पासून सलग अकराव्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दुहेरी अंकात राहिली आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई 12.96 टक्के होती तर डिसेंबर 2021 मध्ये ती 13.56 टक्के होती. दरम्यान, भारताचे वार्षिक औद्योगिक उत्पादन जानेवारीमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढले आहे, जे एका वर्षापूर्वी याच महिन्यात 0.6 टक्क्यांनी घसरले होते.
घाऊक महागाईदेखील वाढली
अन्नधान्याच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाल्यामुळे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईदर (WPI) फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्क्यांनी वाढली, अशी माहिती सरकारने दिली आहे. एप्रिल 2021 पासून सलग अकराव्या महिन्यात घाऊक महागाईदर दुहेरी अंकात राहिला आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई 12.96 टक्के होती तर डिसेंबर 2021 मध्ये ती 13.56 टक्के होती. कोरोना महामारीच्या संकटापासून महागाईमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसतो आहे.
“फेब्रुवारी 2022 मधील महागाईचा उच्च दर मुख्यत: खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ आणि गैर-खाद्य वस्तू इत्यादींच्या किंमतीत मागील वर्षीच्या त्याच महिन्याच्या तुलनेत वाढ झाल्यामुळे आहे,” असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये खाद्यपदार्थांशी निगडीत महागाई 8.19% वर आली आहे. हा दर आधीच्या महिन्यात 10.33% च्या वाढीपेक्षा कमी आहे. डिसेंबरमध्ये 31.56% वरून जानेवारीत 38.45% पर्यंत वाढल्यानंतर भाज्यांच्या किमतींमध्ये महागाई 26.93% पर्यंत कमी झाली. कांद्याच्या घाऊक किंमती 26.37% घसरल्या तर बटाट्याच्या किंमती 14.78% वाढल्या नंतर 14.45% घसरल्या. अंडी, मांस आणि मासे यांच्या किंमती 8.14% वाढल्या तर गव्हाच्या किंमती 11.03% वाढल्या.