महाराष्ट्रात नोकरभरतीत स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. भारतीय टपाल खात्यात नवीन भरती होणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या यादीत एकाही मराठी तरूणाचे नाव नाही. त्यामुळे मनसेकडून ठाण्यात निषेध व्यक्त करण्यात आला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टपाल खात्याच्या ठाण्यातील मुख्य कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. महाराष्ट्रात तरी मराठी मुलांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मराठीच्या मुद्द्यावरून ठाण्यातील मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली. टपाल खात्यात होणाऱ्या भरतीसाठी केंद्र सरकारकडून २७५ जणांची एक यादी तयार करण्यात आली. ही यादी मुंबईतील मुख्य कार्यालय जीपीओकडून विशेषत: महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या २७५ जणांच्या यादीत एकाही मराठी मुलाचे नाव नाही. जर महाराष्ट्रात मराठी मुलांना प्राधान्य दिले नाही, तर मराठी मुलांनी नोकरीसाठी जायचे कुठे? असा सवाल उपस्थित करत मनसेकडून याचा तीव्र निषेध करण्यात आला.