महाड : महाडमध्ये 20 मार्च रोजी ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्षापासून साजरा होत आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या संसर्गामुळे हा सोहळा साजरा झाला नव्हता. यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक चवदार तळे स्मृतीदिन सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री तसेच दिल्ली सरकारचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. राजेंद्रपाल गौतम हे देखील उपस्थित राहणार आहेत.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १९–२० मार्च १९२७ आली ऐतिहासिक चवदार तळे येथे सामाजिक क्रांती केली. देशातील तमाम दलित, शोषित, पीडित आणि तळागाळातील घटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा सार्वजनिक पाणवठ्यावर मिळावी याकरिता चवदार तळे येथे सत्याग्रह केला. या दिनाचा स्मृती दिन महाड क्रांती भूमीत साजरा केला जातो. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक दरवर्षी महाडला येऊन चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. यावर्षी देखील या क्रांती दिनाच्या निमित्ताने लाखो भीमसागर येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.