⭕️ राज्यात आतापर्यत ‘आरटीओ’कडून ६१ वाहनांवर कारवाई
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाचा गैरफायदा खासगी प्रवासी बस वाहतुकदार घेत असून होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांकडून दुप्पट, तिप्पट भाडे आकारले जात आहे. या विरोधात प्रवाशांच्या तक्रारीही येत असून जादा भाडेदर घेणाऱ्या ६१ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. जादा भाडे घेतल्यास ई-मेलद्वारे तक्रार करा, असे आवाहनही परिवहन विभागाने केले आहे.
परिवहन विभागाने राज्यात १६ मार्चपासून जादा भाडेदर घेणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतुकदारांविरोधात कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रवासांर्तगत बस मालकाने प्रवाशाकडून जादा भाडे आकारल्यास परिवहन आयुक्त कार्यालय किंवा नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाकडून transport.commr-mh@gov.in ई मेल आयडीही देण्यात आला आहे. या ईमेल आयडीवर प्रवाशांनी तक्रार करावी. असे परिवहन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.