मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मंगळवारपासून डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी व सिंहगड या चार एक्सप्रेसमधून प्रवाशांना जनरल तिकिटावरुन प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरसुद्धा पॅसेंजर ट्रेन बंद करू, नियमित गाड्यांना विशेष एक्सप्रेस चालवण्यात येत होत्या. याशिवाय आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा होती. त्यामुळे या सर्व बाबींना प्रवासी वर्गात चांगलाच कंटाळलेला होता. विशेष म्हणजे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांची प्रवासी संख्या मोठी आहे. त्यातच गेल्या साडेचार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहे. मात्र, आता मध्य रेल्वेने मंगळवारपासून डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेस या चार रेल्वेगाड्यामधून जनरल तिकिटावरुन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
दररोज मुंबई- पुणे धावणाऱ्या चार पॅसेंजर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जनरल तिकीट सुविधा तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहे. ज्यात डेक्कन क्वीन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेस समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ मार्चपासून होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.