⭕ उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता जप्त
मुंबई : आतापर्यंत शिवसेना आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईच्या बातम्या येत होत्या. परंतु आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुटुंबिंयावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. पाटणकर यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट) अंतर्गत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मुंबईजवळील ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 निवासी सदनिका जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी केला आहे. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे “मालक आणि नियंत्रक असल्याचे इडीने म्हटले आहे. पाटणकर यांच्यावरील या कारवाईत या सदनिकांसह अंदाजे 6 कोटी 45 लाख रुपये किमतीची मालमत्तां जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ईडीच्या या कारवाईबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनातून तात्काळ मातोश्री निवासस्थानाकडे निघाले. मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत रवाना झाले. त्यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.