रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं असून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्याविरोधात ट्विट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देऊन शिवसैनिकांसाठी वेगळे नियम आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “इतिहास सांगतो…मनोहर जोशी यांना त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर, बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग तोच नियम इथे लागू होणार? की शिवसैनिकांसाठी वेगेळे नियम आहेत?” असा सवाल आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून उपस्थित केला आहे.