सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात बुधवारी दुपारनंतर सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील खांबाळे परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे आंबा, काजू बागायतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे वैभववाडी शहरात आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची व व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तसेच सध्या शिमगोत्सव सुरु असून या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. या पावसाचा परिणाम आंबा-काजू बागायतीवर होणार आहे. आधीच शेतकरी बागायतदार निसर्गातील बदलांमुळे चिंतेत असताना वारंवार अवकाळीचे संकट येत असल्याने ते हवालदिल झाले आहेत.
मागील काही महिन्यात पडलेल्या पावसामुळे आंबा-काजू हंगाम लांबणीवर गेला होता. त्यामुळे यावर्षी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी येण्यास उशीर झाला आहे. तर आता पुन्हा पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेले उत्पन्न सुद्धा निसटण्याची शक्यता आहे.