मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का, ईडीने 11.35 कोटींची संपत्ती केली जप्त

मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का, ईडीने 11.35 कोटींची संपत्ती केली जप्त

महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते आणि मंत्री सध्या ईडीच्या (ED) रडारवर आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर कारवाई करत त्यांच्या मालमत्तेवर ईडीने छापेमारी केली आहे. अशामध्ये आता ईडीने शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दणका दिला आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांची तब्बल 11.35 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने एनएसईएल घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ही कारवाई केली आहे.

ईडीने प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ईडीने ही कारवाई करत प्रताप सरनाईक यांची तब्बल 11.35 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एनएसईएल घोटाळा (NSEL Scam) प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, 25 डिफॉल्टर आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL)प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले, बनावट कागदपत्रं तयार केली, खोटी खाती तायर केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. 13 हजार गुंतवणूकदरांची 5,600 कोटींची फसवणूक केल्याची माहिती ईडीने दिली आहे.

दरम्यान, नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बिल्डर योगेश देशमुख याला अटक करण्यात आली होती. सुमारे 5600 कोटींच्या सावकारीशी संबंधित हे प्रकरण आहे. योगेश देशमुख याला कल्याण येथून 6 एप्रिल 2021 रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक आणि योगेश देशमुख यांच्यात आर्थिक संबंध असून टिटवाळ्याजवळ गुरवली येथील 78 एकर जागा देखील प्रताप सरनाईक यांनी देशमुख यांच्याकडून खरेदी केल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई सुरुच आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी आणि सीबीआयनं 18 मे 2021 रोजी एकाच वेळी छापेमारी केली होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *