रत्नागिरी : पर्यटन संचालनालय, निसर्गयात्री संस्था आयोजित पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव आजपासून थीबा राजवाडा परिसरात सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन वृध्दीसाठी या महोत्सवाचा चांगला उपयोग होणार आहे.
कला प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता उपसंचालक श्री. हेडे यांच्या हस्ते होत आहे. या प्रदर्शनात रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यातील पर्यटनस्थळांचे सादरीकरण करणारे ४ स्टॉल, अवेकनिंग ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांच्या वस्तूंचे स्टॉल्स आहेत. तसेच कथित संस्थेने साकारलेल्या वारसा जपणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन, देवरुखच्या डी कॅड कॉलेजचे कला प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. दगडांमधील प्रकार, दगडांपासून आदिमानव हत्यारे कशी तयार करत होता याचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक प्रा. डॉ. तोसोपंत पधान दाखवणार आहेत. कातळ खोद चित्रांच्या भेटवस्तूंचे प्रदर्शन, वाळू व अन्य माध्यमातून खोद चित्रांच्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. पुरातत्त्वशास्त्राचे विद्यार्थी प्राचीन काळातील खेळांचे सादरीकरण करणारे स्टॉल्स मांडणार आहेत.
तसेच कोकणी खाद्य जत्राही भरवण्यात येणार आहे. यामध्ये पानगी, खादाडी कट्टा, आरती डायनिंग, सिद्धाई फूड प्रॉडक्टस आदींचा समावेश आहे.
शनिवारी संध्याकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत बाबर, इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकुर, प्रा.डॉ. तोसो पधान, पुरातत्व विभाग सहायक संचालक विलास वहाणे, माजी माहिती व जनसंपर्क अधिकारी सतीश लळित, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी महोत्सवाकरीता सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. त्यानंतर मान्यवर मार्गदर्शन करतील. नंतर संगमेश्वरी बोली कार्यक्रम, नमन, गाऱ्हाणे, शॉर्ट फिल्मचे सादरीकरण, जाखडी, कोकणातील कातळशिल्पांची माहिती देणारे सादरीकरण असे कार्यक्रम होतील.
रविवारी (ता. २७) संध्याकाळी ६ वाजता नांदीने कार्यक्रमाला सुरवात होईल. त्यानंतर आडवळणावरच्या कोकणचे पैलू उलगडणारे सादरीकरण सादर होईल. त्यानंतर कातळशिल्पांचे शोधकर्ते डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, रिझा अब्बास, डॉ. तोसोपंत प्रधान, सुधीर रिसबूड व सहकाऱ्यांसोबत गप्पा टप्पा कार्यक्रम आणि नंतर भजन, वाद्यवृंद कार्यक्रमाने सांगता होईल. रत्नागिरीवासियांना
दोन दिवस ज्ञान, मनोरंजन व पर्यटन याची भरपूर मेजवानी यानिमित्ताने मिळणार आहे.