ऑस्ट्रेलिया संघासाठी त्यांचा पाकिस्तान दौरा यशस्वी ठरला आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिका देखील नावावर केली. हा सामना लाहोरमध्ये खेळला गेला असून ऑस्ट्रेलियाने ११५ धावांनी विजय मिळवला. या विजायनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. पराभवानंतर पाकिस्तान संघाला नुकसान झाले असून भारताला मात्र फायदा झाल्याचे दिसत आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामात ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर होता. पकिस्ताविरुद्धची कसोटी मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला क्रमांक अधिक भक्कम केला आहे.
मालिकेत पराभव मिळाल्यानंतर पाकिस्तानने गुणतालिकेतील दुसरा क्रमांक गमावला असून त्यांचा संघ आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. उभय संघातील या मालिकेचा फायदा भारतीय संघाला झाल्याचे दिसते. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. गुणतालिकेत दक्षिण अफ्रिका संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाची जिंकण्याची सरासरी ७५ टक्के आहे. ऑस्ट्रेलियाने ५ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने अनिर्णीत केले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण अफ्रिकेचा विचार केला, तर त्यांची विजयाची सरासरी ६० टक्के आहे. दक्षिण अफ्रिकेने ३ सामन्यांमध्ये विजय आणि २ सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे.
तिसऱ्या क्रमांकावरील भारतीय संघाने ६ सामने जिंकले आहेत, ३ सामन्यामध्ये पराभव पत्करला आहे, तर २ सामने अनिर्णीत राहिले आहेत. पाकिस्तान संघ चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानने ३ सामने जिंकले, २ सामने गमावले आणि २ सामने अनिर्णीत केले आहेत.