इचलकरंजी/प्रतिनिधी –
भागात नागरी सुविधा पुरवाव्यात यासाठी वारंवार मागणी करुनही त्याकडे नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात आहे. प्रशासनाच्या कारभारचा निषेध करत कृष्णानगर भागातील नागरिकांनी भागात तातडीने नागरी सुविधांची पुर्तता करण्यासह ऑक्सिजन पार्कची दूरवस्था थांबवावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. सुविधांची पुर्तता न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहापूर परिसरातील कृष्णानगर भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. मात्र याठिकाणी आवश्यक नागरी सुविधा नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. भागात गटारच नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाणी भागातील रिकाम्या जागेत साचून रहात असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून साथींचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यंतरीच्या काळात या भागात डेंग्युचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. याठिकाणी नागरी सुविधा द्याव्यात यासाठी वारंवार लेखी-तोंडी निवेदन देण्यात आली आहेत. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे. प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करत भागातील नागरिकांनी पुन्हा निवेदन दिले आहे.
या भागात गट क्र. 389 मध्ये 36 गुंठ्यात ऑक्सिजन पार्क निर्माण केला आहे. परंतु याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने येथील झाडाची नासाडी होत आहे. शिवाय रात्रीच्या सुमारास हा पार्क अश्लिल चाळ्यांसह ओपनबार बनतो. त्यामुळे हे पार्क नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे याठिकाणी तातडीने सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी स्विकारले. यावेळी माजी नगरसेवक मदन झोरे, इंजिनिअर हावळ, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी फरीद मुजावर, एजाज बागवान, धनंजय साखरे, मोहसिन बागवान, दिगंबर साखरे, मोहसिन जमना, अजय पडियार, विजय पडियार, इकबाल शेख़, गफुर मोमीन , इरफान रंगगरेज , शाहबाज मदारशा, हर्षद करड़ी, अकबर आलासे, आसिफ बागवान, यासीन जमना, महंमद कडगावकर, रवि गोसावी, मुमताज मुजावर, बेबी आलासे, रशिदा मदरशा, मुमतजा सय्यद, रोशन मोमीन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
शहापूर कृष्णानगर भागात नागरी सुविधांचा अभाव ; नागरिक त्रस्त जन आंदोलनाचा इशारा
