रत्नागिरी : पर्यटन संचालनालय, निसर्गयात्री संस्था आयोजित पहिल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवातील विविध प्रदर्शनांचे उदघाटन आज थिबा राजवाड्याच्या प्रांगणात सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा वारसा पुढे न्यावयाचा असल्याने विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन केले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली.
या प्रदर्शनात कातळशिल्पांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. कातळशिल्प म्हणजे काय, कोकणात दहा हजार वर्षांपूर्वी येथे कातळशिल्पे कशी चितारली याचा इतिहास सांगण्यात येत आहे. महोत्सवात कोकणी खाद्यजत्राही भरवण्यात आली आहे.
रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यातील पर्यटनस्थळांचे सादरीकरण करणारे ४ स्टॉल, अवेकनिंग ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांच्या वस्तूंचा स्टॉल, डीकॅड कॉलेजचे कला प्रदर्शन दगडांपासून हत्यारे बनवण्याची साधने, ओरिगामी प्रदर्शन आहे. ट्रेक डायरी या युट्यूब चॅनेलतर्फे कोकणातील पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे.
कलाप्रदर्शन उद्घाटनावेळी माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, सुहास ठाकुरदेसाई, राजू भाटलेकर, प्रसाद देवस्थळी, श्रीवल्लभ साठे, युयुत्सू आर्ते, ॲड. प्रशांत पाध्ये, तनया शिवलकर, डॉ. तोसोपंत प्रधान, डॉ. शाश्वत शेरे, ऋत्विज आपटे आदी उपस्थित होते.