इचलकरंजी/प्रतिनिधी -येथील अमृत महोत्सवी मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेला आर्थिक वर्षात 36 लाख 70 हजार 600 इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासले असून संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.
मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेची 76 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना चेअरमन श्री. दत्तवाडे बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत संचालक विश्वनाथ अग्रवाल यांनी केले. दुखवटा ठराव वाचन संचालक शिवबसू खोत यांनी केले.
संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी, थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त कै. बाबासाहेब खंजिरे यांची संकल्पना आणि सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाली संस्था कार्यरत आहे. संस्थेने अमृत महोत्सव निमित्त ५०० रुपये बोनस शेअर्स व १२ टक्के लाभांश दिला आहे. संस्थेचे 1836 इतके सभासद असून सातत्याने संस्था सामाजिक उपक्रम राबवित आहे. आर्थिक वर्षात संस्थेला 36 लाख 70 हजार 600 रुपये इतका नफा झाला आहे. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून सभासदांना सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. तसेच वसाहतीतील जागा सभासदांच्या नावे करून दिली जाणार असल्याचेही जाहीर केले.
संस्थेचे सेक्रेटरी महेश पाटील यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दिली.
याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन निवृत्ती गलगले, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, प्रकाशराव सातपुते, अहमद मूजावर, बाळासाहेब कलागते, शामराव कुलकर्णी, महादेव कांबळे, सर्जेराव पाटील, राजेंद्र बचाटे, बाळासाहेब देवनाळ, राजू माळी आदीसह संस्थेचे संचालक श्रीमती सुधा जाधव, सौ. भारती जानवेकर, मनोहर काकडे, राहुल बंडगर, शिवानंद बन्ने, आदी उपस्थित होते. आभार तज्ञ संचालक जयवंत म्हेतर यांनी मानले. सूत्रसंचालन विजय हावळे यांनी केले.
Posted inकोल्हापूर
मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेला आर्थिक वर्षात 36 लाख 70 हजार 600 इतका निव्वळ नफा – चेअरमन प्रकाश दत्तवाडे
