अपूर्ण अभ्यासक्रम असलेल्याच शाळा एप्रिलमध्ये राहणार सुरू, शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण
मुंबई : शाळांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्याने एप्रिल महिन्यात पूर्णवेळ शाळा भरणार असल्याचा निर्णय काल सोमवारी जाहीर करण्यात आला होता. या निर्णयामुळे बच्चेकंपनी नाराज झाली होती. मात्र, शिक्षण विभागाने आता या निर्णयात थोडा बदल केला आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे अशाच शाळा एप्रिल महिन्यात सुरू राहणार असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितलं आहे. तसेच, मे महिन्यात नेहमीप्रमाणे शाळा बंदच राहणार असून पुढील शैक्षणिक वर्ष जूनच्या मध्यापर्यंत सुरू होणार असल्याचीही माहिती देण्यात आली.
“कोव्हिड काळात ऑनलाईन शिक्षणातील मर्यादेमुळे ज्या शाळा अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत, अशा शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्यात येणार आहेत. ज्या शाळेत अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे त्या शाळा विनाकारण सुरू ठेवण्यात येणार नाहीत. तसेच मे महिन्यामध्ये शाळा सुरू ठेवाव्यात असे निर्देश दिले नसल्याने आणि पुढचे शैक्षणिक सत्र जूनच्या मध्यावर सुरू होणार असल्यामुळे मुलांच्या सुट्टीचेही कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे शासनाचे निर्देश नीट समजून घ्यावे”, असं राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात ऑनलाईन वर्ग भरवण्यात येत होते. मात्र, ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. संसर्ग कमी झाल्याने आता शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, अभ्यासक्रम अपूर्ण राहत असल्याने पालक आणि शिक्षक चिंतेत आहेत. त्यामुळे अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला असून अपूर्ण अभ्यासक्रम असलेल्याच शाळा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.