कोल्हापूरमध्ये रिंगण सोहळ्यावरून पोलीस व गावकऱ्यांमध्ये राडा
कोल्हापूर : प्रतीपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील नंदवाळ गावात, आरक्षित जागेत रिंगण सोहळा करण्यावरून पोलीस आणि गावकरी यांच्यात धक्काबुकी झाली. यावेळी पोलिसांनी काही गावकऱ्यांना मारहाण केली. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांची समजूत काढल्याने हा वाद मिटला.
नंदवाळ गावातील भारत बटालियनच्या आरक्षित जागेवर गावकऱ्यांनी रिंगण सोहळा आयोजित केला होता. मात्र आपल्या जागेवर रिंगण सोहळा करू देणार नाही अशी भूमिका भारत बटालियनने घेतली. त्यावर जागा आमच्या गावची आहे. त्यामुळे आम्ही इथेच रिंगण सोहळा करणार अशी आग्रही भूमिका गावकऱ्यांनी घेतली आणि रिंगण सोहळ्याची तयारी सुरु केली. त्यामुळे भारत बटालियनने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गावकरी ऐकायला तयार नव्हते. त्यातच संपूर्ण गाव रस्त्यावर उतरला. त्यात महिलाही होत्या. त्यामुळे पोलिसांनी ज्यादा कुमक मागवली आणि बळाचा वापर सुरु केला. त्यामुळे गावकरी चिडले आणि त्यांनी पोलिसांनाच धक्काबुक्की करायला सुरुवात केली.
दरम्यान, गावकरी आणि पोलीस यांच्या धुम्मचक्री सुरु झाली. काही गावकऱ्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेकही केली. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांची समजूत काढली आणि हा वाद मिटवला .