अखेर कोरोना प्रतिबंधक कॉलर ट्युन बंद होणार
कोरोना प्रतिबंधक जनजागृतीसाठी भारत सरकारकडून प्री-कॉल (कॉलर ट्युन) मोहिम राबवली होती. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीला फोन करताना आधी प्री-कॉल ऑडियो ऐकू यायचा. हा प्री-कॉल ऑडिया संपल्यावरच संबंधित व्यक्तीला फोन जायचा. भारत सरकारच्या या मोहिमेमुळे अनेकजण प्रचंड त्रस्त झाले होते. मात्र, आता प्री-कॉल ऑडिओ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूरसंचार विभागाने यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून कोरोनासंबंधित कॉलर ट्युन म्हणजेच प्री-कॉल ऑडिओ बंद करण्याची शिफारस केली आहे. ऑडिओ बंद करण्यारता सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि मोबाईल ग्राहकांकडून मागणी करण्यात येत होती, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे साथीच्या आजाराची स्थिती सुधारत असल्याने आरोग्य मंत्रालय ही ऑडिओ क्लिप काढून टाकण्याचा विचार करत आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सरकारने अनेक जनजागृती मोहिमा राबण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोरोना कॉलर ट्युन आणि प्री-कॉलचा समावेश होता. २१ महिन्यांत या सेवेने आपली भूमिका चोख बजावली असून लोकांमध्ये जनजागृती करण्यात पूर्ण सेवा दिली आहे. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा ऑडिओ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.