नाणार प्रकल्प होणार का? समर्थक-विरोधक आदित्य ठाकरेंना भेटले
राजापूर : आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रत्नागिरीच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी ते राजापुरात आले असता भाजप-शिवसेना अशा सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, अशी मागणी केली. हा प्रकल्प झाला तर स्थानिक भूमीपुत्राला नोकर्या मिळतील, अशी सर्वपक्षीय नेत्यांनी आदित्य ठाकरेंकडे भूमिका मांडली. तर त्याचवेळी रिफायनरी प्रदुषणकारी असल्याने रिफायनरी नकोच, असे पोस्टर रस्त्यावरच्या दोन्ही बाजुला लावण्यात आले होते. रिफायनरी विरोधकांनी देखील आदित्य ठाकरेैची भेट घेतली.
या भेटीगाठीत आदित्य ठाकरे म्हणाले की, नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्याने होणार्या मागणीमुळे आपण तिथून तो हलवला आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणे सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढे जायचे आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. नाणार समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन. जी कोणी कंपनी येईल, तिने स्थानिकांशी पहिले बोलावे, असा आमचा आग्रह आहे.
स्थानिकांशी चर्चा करुन कंपनीने सत्य परिस्थिती सांगावी, त्यांच्या मनातील शंका दूर कराव्यात आणि सगळ्याचा विश्वास जिंकून प्रकल्प आणू, कोकणात चांगला प्रकल्प पाहिजे, मात्र त्यापूर्वी प्रकल्पाग्रस्तांना काय न्याय मिळणार, त्यांचे पुनर्वसन कसे होणार, स्थानिकांना आणि महिलांना कशा नोकर्या मिळणार याप्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.