निकाल लांबणार? दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका न तपासता शिक्षकांनी परत पाठवल्या
मुंबई : आंदोलन करुन इशारा देऊनही अद्याप विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान न मिळाल्याने म.रा. विना अनुदानित व अनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वात कोल्हापूर आणि बीडमधील शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका न तपासता बोर्डाकडे परत पाठवले आहे. तर मुंबईतील सर्वविनाअनुदानीत शाळांतील शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नसून सर्व उत्तरपात्रिका मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिल्या आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीचा निकाल उशिराने लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, सचिव शिक्षण विभाग, शिक्षण मंडळ यांना संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन मागण्या तत्काळ सोडविण्यासाठी विनंती करुनही न्याय मिळत नाही, यासाठी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा उत्तरपत्रिका तपासणीस बहिष्कार टाकला असून जोपर्यंत आमच्या कायम विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे यांनी सांगितले.
बीड आणि कोल्हापूर विभागात 2 हजार शिक्षकांनी बोर्डाकडून आलेल्या उत्तरपात्रिकेचे गठ्ठे न तपासता परत पाठवले. महाराष्ट्रातील सर्व विभागातील समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल जोपर्यंत घेतली जाणार नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीस बहिष्कार असेल, असे डावरेंनी सांगितले.