लॉकडाऊन काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेणार, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : लॉकडाऊन काळात कोरोना प्रतिबंधक नियम मोडल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
“कोविडच्या काळात ज्या नागरिक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.
कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून लॉकडाऊन काळात अनेक नियम लादण्यात आले होते. या नियमांचं उल्लंघन केलेल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.