रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला आहे. नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे.
रिफायनरी विरोधात सोलगाव बारसु परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आज (बुधवारी) रस्त्यावर उतरले आहेत. रिफायनरी विरोधी समितीचे अशोक वालम, अमोल बोळे, प्रकल्प विरोधी समितीचे नेते सत्यजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. राजापूर येथील जवाहर चौकातील खर्ली नदीपात्रातून मोर्चाला सुरूवात झाली आहे.
जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची … एकच जिद्द रिफायनरी रद्द … रिफायनरी हटवा … कोकण वाचवा …. अशा घोषणा देत नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय आहे. हातात बॅनर घेऊन नागरिक सहभागी झाले आहेत.
रिफायनरी प्रकल्पावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. मात्र, विरोधामुळे हा प्रकल्प तेथून स्थलांतरीत केला आहे.चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन असेही त्यांनी म्हटले.