Arvind Kejriwal House Attacked काश्मीर फाइल्सवरून भडका; केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

Arvind Kejriwal House Attacked काश्मीर फाइल्सवरून भडका; केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

⭕️ भाजपवर आपचा गंभीर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्वीट केले असून त्यांनी थेट भाजपवर आरोप केला आहे. ‘भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर चाल करून जात हल्ला केला. पोलिसांचीही त्यांना साथ होती. पोलिसांनी हल्लेखोरांना अटकाव न करता केजरीवाल यांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी सुरक्षा पुरवली’, असा गंभीर आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.

केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने करत तोडफोड करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरा तसेच सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरियर तोडण्यात आले आहेत. घराच्या गेटवरही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सिसोदिया यांनी हा हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचा आरोप केला. ‘भाजपला अरविंद केजरीवाल यांना जीवे मारायचे आहे. त्यासाठीच कट रचून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. निवडणुकीत केजरीवाल यांचा पराभव करू शकत नसल्याने आता अशा माध्यमातून त्यांना संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले आहे’, असा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला.

दरम्यान, द काश्मीर फाइल्स हा चित्रपट दिल्लीत टॅक्स फ्री करण्यास नकार देत केजरीवाल हे भाजपवर चौफेर हल्ला करत आहेत. भाजप या चित्रपटाचं राजकारण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच केजरीवाल यांचा निषेध करण्यासाठी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भाजप युवा मोर्चाच्या सुमारे १५० ते २०० कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानावर धडक देत निदर्शने केली. दुपारी एक वाजताच्या सुमारास काही निदर्शक बॅरिकेड्स तोडून आत घुसले. तिथे मुख्य गेटवर लाल रंग फेकत निदर्शकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी किमान ७० जणांना ताब्यात घेतले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *