⭕️गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची मागणी
⭕️संघटनेचे शिष्टमंडळ जि.प सीईओ यांची घेणार भेट!
रत्नागिरी : ग्रामीण भागात अनेक जेष्ठ नागरिक हे एकटे घरी वास्तव्यास असतात.मुलं मुंबई पुण्यात कामासाठी असल्याने अनेक वृद्ध नागरिकांना गावात एकटे रहावे लागते, अशा नागरिकांची महिन्यातून एकदा जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत घरी जाऊन मोफत आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे.
या मागणीसाठी गाव विकास समितीचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांची भेट घेणार असल्याची माहिती सुहास खंडागळे यांनी दिली आहे.गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी,जिल्हा संघटक मनोज घुग,सुनिल खंडागळे,रत्नागिरी तालुका संघटक सुकांत पाडाळकर,महिला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे,देवरुख विभाग अध्यक्षा अनघा कांगणे,सदस्या इश्वरी यादव यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशी अनेक गाव खेडी आहेत जिथे काही घरांमध्ये फक्त वृद्ध नागरिक वास्तव्यास आहेत.त्यांची मुलं ही आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत असतात व औषध उपचारासाठी पैसेही पाठवत असतात मात्र ते दूर शहरात वास्तव्यास असल्याने अनेक वेळा इमर्जन्सी वेळी दुर्गम भागात मोबाईल रेंजची वैगरे अडचण भासत असते,त्याच बरोबर गावखेड्यातील वस्त्यांचे तालुक्याच्या ठिकाणी अंतर दूर असल्याने अनेकवेळा वृद्ध नागरिकांना गंभीर आजाराबाबत दवाखान्यात जाणे जमत नाही,परिणामी वेळीच गंभीर आजारांची माहिती मिळत नाही.त्याच बरोबर मधुमेह व ब्लड प्रेशर च्या रुग्णांची वेळीच तपासणी न झाल्याने आजार लक्षात येत नाही याबाबी लक्षात घेऊन किमान महिन्यातून एकदा मोफत आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने करावी असे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.जे वृद्ध नागरिक एकटे गावात राहत असतात अशा वृद्ध नागरिकांची महिन्यातून एकदा घरी जाऊन मोफत वैद्यकीय तपासणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने करावी अशी मागणी गाव विकास समिती मार्फत सुहास खंडागळे यांनी केली आहे.गाव विकास समितीच्या शिष्टमंडळामार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची याबाबत लवकरच भेट घेतली जाणार आहे.