पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ कोल्हापुरात उद्घाटन संत साहित्यात विश्व कल्याणाची ताकद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ कोल्हापुरात उद्घाटन संत साहित्यात विश्व कल्याणाची ताकद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ कोल्हापुरात उद्घाटन
संत साहित्यात विश्व कल्याणाची ताकद

  • राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
    कोल्हापूर दि.. : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
    कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित ‘पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष म्हणून ह.भ.प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी तर स्वागताध्यक्ष म्हणून संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते. कार्यक्रमास मान्यवर साहित्यिक, पादाधिकारी, वारकरी, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.अमरवाणी इव्हेंट्स फाउंडेशन आयोजित पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि इंडसमून मीडिया, मुंबईद्वारा हे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे प्रायोजित करण्यात आले आहे.
    राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सारे विश्व हे आपले घर असल्याची शिकवण संतांनी दिली आहे. आज मात्र आपण या शिकवणीपासून दूर जावून नात्या-नात्यात गुंतलो आहोत. सुखी जीवनासाठी संत साहित्याचे मनन, चिंतन करुन त्यांचे आचार-विचार प्रत्येकाने आचरणात आणावेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुलसीदास, गौतम बुद्ध, गुरु गोविंदसिंग यांच्यासह सर्व धर्मातील संतांनी त्यांच्या साहित्यातून विश्व कल्याणाची शिकवण दिली आहे.
    संतांची साधना मोठी आहे, सारे लोक ईश्वराची लेकरे आहेत, ही भावना सर्वसामान्यांच्या मनात संतांनी रूजवली. जगाला आश्चर्य वाटावे अशी पंढरपूर येथे वारी होत आहे. या वारीतून संतांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. संतांची ही भावना जगासमोर आणण्यासाठी संत साहित्याचे अध्ययन होणे गरजेचे असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी सांगितले.
    जगातील अनेक तत्वज्ज्ञ ज्ञानेश्वरीसह भारतातील अन्य धर्मग्रंथांचे अध्ययन करीत असून संत साहित्याचा देश विदेशात प्रचार होणे गरजेचे आहे. कोल्हापुरात घेण्यात आलेल्या या संत साहित्य संमेलनातून विश्वकल्याणाचा विचार सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.
    विश्वाच्या कल्याणासाठी संताचे विचार, आचार, साहित्य सर्वांसमोर यावे यासाठी संयोजकांनी भरविलेल्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनास शुभेच्छा देवून यासाठी पाच लाख रुपये मदत देत असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जाहिर केले.
    संमेलनाध्यक्ष ह.भ.प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी म्हणाले, मानवाच्या कल्याणाचे सूत्र संत साहित्यात आहे. संतांचे विचार, शिकवण जनसामान्यांपासून गाव-शिवारापर्यंत नेण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्व धर्मांचे तत्वज्ञान जगासमोर येईल. मानवामध्ये विश्व बंधुत्वाचा धागा आहे. कोरोनाच्या संकट काळात एकमेकाला मदत करण्याची भूमिका यामुळेच दिसून आल्याचेही ते म्हणाले.
    संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘हे विश्वची माझे घर’ मानून संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी जगाच्या कल्याणासाठी कार्य केले. विश्वाला शिकवण देण्याची ताकद संत साहित्यात आहे. या विचारांच्या जोरावर कोणत्याही देशावर आलेल्या संकटात भारत देश योग्य विचार व दिशा देवून कठीण परिस्थिती बदलण्याची भूमिका बजावू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संतांनी आपल्या साहित्यातून भूतदया हा मंत्र जगासमोर आणला. संमेलनाच्या माध्यमातून हा मंत्र जोपासण्याचा विचारही रुजेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी देश-विदेशातील संत साहित्यिकांशी संवाद साधला.
    तत्पूर्वी सकाळी टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ह.भ.प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी व लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ दालनाचे उद्घाटन संत साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते तर अध्यात्मिक विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या चित्रदालनाचे उद्घाटन डॉ. सुहास बहुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
    00000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *