गझल प्रेमऋतूची ‘ संग्रहाचे नागपुरात साहित्य संमेलनात प्रकाशन

गझल प्रेमऋतूची ‘ संग्रहाचे नागपुरात साहित्य संमेलनात प्रकाशन

‘गझल प्रेमऋतूची ‘ संग्रहाचे नागपुरात साहित्य संमेलनात प्रकाशन

नागपूर ता.१८, ख्यातनाम गझलकार प्रसाद कुलकर्णी ( इचलकरंजी ) व प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा ( मुंबई ) यांच्या ‘गझल प्रेमऋतूची ‘ या गझल संग्रहाचे प्रकाशन नागपूर येथे बालाजी सरोज भावकाव्य समूहाच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्ष प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा होत्या. हे प्रकाशन सरोज अंदनकर , विष्णू मनोहर ,प्रा. सुनंदा पाटील , डॉ. दत्ताजी हरकरे , प्रफुल्ल माटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरोज अंदनकर यांच्या ” देवाचिये द्वारी ” या अभंग संग्रह व सुनंदा पाटील यांच्या” या वळणावर ” हा कथासंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्षा प्रा.सुनंदा पाटील म्हणाल्या,
नव्याने लिहिणाऱ्यांना व्यासपीठ न मिळाल्याने त्यांना अनुभव येत नाही .आणि ते अनुभवी नाहीत म्हणून त्यांना व्यासपीठ मिळत नाही. हे दुष्टचक्र थांबण्यासाठी लहान आणि विभागीय साहित्य संमेलनांची गरज आहे. आज लिहिते हात वाढत आहेत.आपला शब्द आपल्या जवळ आहे ,तोवरच त्यावर संस्कार करता येतात. एकदा तो प्रकाशित झाला की वाचकाचा होतो. संयम , सातत्य आणि सराव या त्रिसुत्रीनेच कला आपलीशी होते . हीच बाब साहित्यालाही लागू होते.
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सरोज अंदनकर यांनी प्रास्ताविक केले . तसेच उद्‌घाटन जेष्ठ नाट्य लेखक डॉ. पराग घोंगे यांचे हस्ते झाले. साहित्याच्या प्रांगणात कला , कलावंत , आणि आस्वादक हे तीन प्रमुख घटक असतात . साहित्य हाही प्रकार एक कलाच आहे. नाट्य शास्राचे अनेक दाखले देत त्यांनी आपले विचार मांडले.

या संमेलनात विशेष अतिथी म्हणून जागतिक किर्तीचे शेफ श्री . विष्णूजी मनोहर होते. एक दिवशीय संमेलनाला राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांचे त्यांनी अभिनंदन केले. जेष्ठ गायक डॉ. दत्ताजी हरकरे यांनी साहित्य आणि संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे सांगून , स्वतः गाऊन त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. तसेच जशी मराठीने गझल आपलीशी केली , तसेच उद्या सुफी काव्यही मराठीत येऊ शकते , असेही ते म्हणाले. मराठी भाषा पदवी पर्यंतच्या शिक्षणात आवश्यक करण्यात यावी याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

याप्रसंगी संगीतावर आधारीत अनेक कार्यक्रमांचे संयोजन करणाऱ्या आणि सध्या ” जल्लोष स्वातंत्र्याचा ” या कार्यक्रमासाठी गायक , प्रफुल्ल माटेगावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी संमेलनाला शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले . तसेच मराठी गीत सादर करणाऱ्या जेष्ठ गायक मनोज पाठक यांचाही सन्मान करण्यात आला . सरोज अंदनकर यांनी त्यांचे शाळेतले शिक्षक श्री . गेडाम सर यांचा विशेष सन्मान केला.

याप्रसंगी संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या कै. डॉ. सितारामपंत अंदनकर स्मृती कथा संग्रह पुरस्कार , कै. लक्ष्मीकांत दीक्षित काव्यसंग्रह पुरस्कार , कै .सौ . शकुंतला दीक्षित स्मृती काव्य स्पर्धा , कै . सौ . हेमा दीक्षित स्मृती लघुकथा स्पर्धा यांचे पुरस्कार वितरण करण्यात आले.
जेष्ठ लेखक डॉ. अनिल काटकर चंद्रपूर , अजय देशपांडे वरूड , सौ . प्रगती मानकर व अनेक साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.

दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. अनेक उतमोत्तम कविता याप्रसंगी सादर करण्यात आल्या. समारोपाच्या अध्यक्ष जेष्ठ कथा लेखिका सौ . विजया ब्राहमणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या संमेलनात चंद्रपूर ते मुंबई अशा संपूर्ण महाराष्ट्रातून व गोव्यातुन साहित्यिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली नालमवार पाटणबोरी यांनी केले. आभार शिल्पा देवळेकर मुंबई यांनी मानले. कविसंमेलनाचे सूत्रसंचाल वर्षा फटकाळे ठाणे यांनी केले .नागपूर येथील शिव इलाईट सोसायटीच्या भव्य सभागृहात हे एक दिवसीय साहित्यसंमेलन रविवार ता. १७ एप्रिल रोजी संपन्न झाले.
या संमेलनात मोठ्या प्रमाणात साहित्यिकांचा व रसिकांचा सहभाग होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *