
जागतिक एक मे कामगार दिन व एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार संघटनेच्या वतीने सांगली निवारा हे भवन येथे भव्य मेळावा संपन्न
या मेळाव्याचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी मेळाव्यामध्ये असे सांगितले की, सध्या देशामध्ये भारत सरकार कडून कर्मचारी, कामगार व महिला यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. भाजप सरकारने संसदेत आवाजी मतदानाने या देशातील कामगारानी लढा करून लागू करून घेतलेले 27 कामगार कायदे रद्द करून फक्त चार लेबर कोड ( श्रम संहिता)जून दोन हजार बावीस पासून अमलात आणण्याचे कारस्थान सुरू केले आहे. त्यामुळे 4 लेबर कोड मध्ये एकोणतीस कामगार कायद्या मधील कामगारांच्या बाजूने असलेल्या महत्वाच्या कामगार हक्काच्या तरतुदी वगळण्यात आलेले आहेत. म्हणूनच जर चार लेबर कोर्ट अमलात आल्यास कामगारांच्या संपाचा हक्क काढून घेण्यात येणार असून कामगारांना मालक म्हणतील त्या त्यावेळेस काम सोडून जावे लागेल.
विशेष म्हणजे या 4 लेबर कोड संदर्भात नियमावली मंजूर करण्यास महाराष्ट्र शासनाने संमती दिली आहे. हेसुद्धा कामगार विरोधी शासनाचे कृत्य आहे. कामगारांचे हक्क काढून घेण्याबरोबरच आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची तरतूद या चार लेबर कोर्ट मध्ये आहे. इतकेच नव्हे तर भारतातील बांधकाम कामगार कायदा या चार लेबर कोड मुळे रद्द होणार असून बांधकाम कामगारांना मिळणारे लाभ धोक्यात आलेले आहेत. म्हणूनच या पुढील काळामध्ये सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्रित येऊन तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कामगार मेळावा मध्ये बोलताना बांधकाम व्यवसायिक श्री विनायक गोखले यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिरज येथे 230 घरांचा प्रकल्प मंजूर आहे यातील सुरुवातीस 90 फ्लॅट्स नोंदीत बांधकाम कामगारांना देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यांना कल्याणकारी मंडळाकडून दोन लाख रुपयाचे अनुदान मिळणार असून अडीच लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मिळणार आहेत. त्यामुळे साडेदहा लाख रुपयांचा फ्लॅट 90 बांधकाम कामगारांना फक्त सहा लाख रुपये मध्ये मिळणार असून सध्या या फ्लॅटची बाजारभावाने किंमत 14 लाख रुपये पर्यंत आहे त्यांनी संघटनेने सहकार्य केल्याबद्दल निवारा बांधकाम कामगार संघटनेस धन्यवाद दिले.
यानंतर संघटनेच्या नेत्या कॉ सुमन पुजारी यांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये घरकुल मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मंजूर आहेत त्यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून दोन लाख रुपये जादा अनुदान मिळवून देण्यात येईल. तसेच ज्यांना घरासाठी जमीन नाही त्यांना जमीन मिळण्याच्या आंदोलन लवकरच सुरू करण्यात येईल व त्यांचे अर्ज संघटनेच्या ऑफिस वर दोन मे पासूनच भरून घेण्यात येतील.
या मेळाव्यामध्ये कॉ विशाल बडवे यांनी सांगितले की,नोंदीत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी देण्यासंदर्भात बांधकाम कल्याणकारी मंडळ आणि महाराष्ट्र शासनाकडून जानेवारी 2021 मध्ये निर्णय झालेला आहे. परंतु त्याबाबत चे टेंडर अजून निघाले नसल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी टेंडर निघून कॉन्टॅक्ट दील्याशिवाय आपल्याला त्याचा लाभ मिळणार नाही. या सभेमध्ये कोल्हापूरचे बांधकाम कामगार नेते श्री सुहास साका यांनी सांगितले की, 51 हजार रुपये मुलीच्या विवाहास मिळवून घेण्यामध्ये कॉ शंकर पुजारी यांनी पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर यापुढेही नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रुपये मिळाले पाहिजेत. या मंडळाच्या ठरावास शासनाने ताबडतोबीने मंजुरी देणे आवश्यक आहे. हा मेळावा यशस्वी करण्यामध्ये कॉ अश्विनी कांबळे, कॉ विजय पाटील, कॉ अमोल माने, शुभांगी गावडे इत्याडिनी पुढाकार घेतला.
कामगार संघटना संयुक्त कृती समिती सांगली च्या वतीने सकाळी 11 वाजता सांगली स्टेशन चौकात जोरदार निदर्शने करून 1मे दिन साजरा करण्यात आला
यावेळेस 4 लेबर कोड लादू पाहणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेलचे दर ताबडतोब कमी करा अशीही मागणी करण्यात आली. बांधकाम कामगारांचा आणि हमाल माथाडी कामगारांचा कायदा रद्द करता कामा नये कामगार विरोधी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कॉ शंकर पुजारी, साथी विकास मगदूम, कॉ रमेश सहस्त्रबुद्धे कॉ महेश जोतराव, कॉ कुमार लोहार कॉ राहुल जाधव व कॉ उमेश देशमुख इत्यादींनी केले.