–भगतसिंग जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करुन द्यावा : साळुंखे
इचलकरंजी -शहरातील भगतसिंग उद्यानलगत असलेला जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करुन देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्यावतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले. या संदर्भात लवकरच अंमलबजावणी करण्याची ग्वाही डॉ. ठेंगल यांनी दिली.इचलकरंजी नगरपालिकेच्यावतीने शहरात भगतसिंग उद्यानलगतच भगतसिंग जलतरण तलाव आणि गावभागात नाट्यगृहाशेजारी कै. शंकरराव पुजारी जलतरण तलाव बांधण्यात आले आहेत. जलतरणपटूंना पोहण्याचा सराव करण्यासह नागरिकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून त्याचा वापर केला जातो. मात्र मागील दोन वर्षे कोरोना महामारीत शासन निर्बंधामुळे हे जलतरण पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. भगतसिंग जलतरण तलाव देखभाल खर्च अत्यल्प असून तेथून मिळणारे उत्पन्न अधिक आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु आहे. भगतसिंग जलतरण तलाव बंद असल्याने गावभागातील एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून तेथील पाणी दुषित होत असल्याने तलाव बंद ठेवावा लागतो. त्यामुळे सध्या बंद असलेला भगतसिंग जलतरण तलाव नगरपालिका प्रशासनाने नागरिकांसाठी खुला करुन द्यावा, या संदर्भात जलतरण तलावाच्या सभासदांसह नागरिकांनी माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. त्यावर श्री. साळुंखे यांनी या प्रश्नी प्रशासक डॉ. ठेंगल यांची भेट घेऊन नागरिकांचे म्हणणे सादर करत माळभागातील नागरिकांना गावभागात जाणे-येणे लांब होत असून या नागरिकांसाठी भगतसिंग जलतरण योग्य असल्याने तो खुला करुन द्यावा या मागणीसह वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यावर प्रशासक डॉ. ठेंगल यांनी लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे, जहांगीर पट्टेकरी, बाळू केसरे, चंद्रकांत निर्मळे, रत्नाकर उरुणकर, रमेश राणे, बाळासाहेब मेटील, अनिल चव्हाण, बट्टू बडवे, श्री. खांडेकर, ओम दायमा, सदाशिव आरडे, सुकुमार केटकाळे, श्री. जाधव, दिलीप रेडेकर, बापू पाटील, सतिष भस्मे उपस्थित होते.