Coronavirus: नॉर्थ कोरियात कोरोनाचा हाहाकार, ५० मृत्यू; १२ लाख कोरोना बाधित, सैन्य तैनात

प्योंगयांग – उत्तर कोरियामध्ये कोरोना महामारीनं हाहाकार माजवला आहे. याठिकाणी रविवारी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ३ लाख ९२ हजार ९२० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नॉर्थ कोरिया प्रशासनात खळबळ माजली आहे. औषधांचा पुरवठा उशीरा होत असल्याने किम जोंग उननं अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. त्यासोबत कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याला उतरवण्याचे आदेश दिले आहेत.

किम जोंग उननं सैन्याला प्योंगयांगमध्ये महामारीविरोधात मैदानात उतरण्याचे आदेश दिले आहेत. नॉर्थ इमरजेंसी एंटी व्हायरस मुख्यालयाकडून सांगितले आहे की, एप्रिलअखेरपासून आतापर्यंत जवळपास १२ लाख कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. ५ लाखाहून अधिक लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. रविवारी नॉर्थ कोरियात ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० लोकांनी जीव गमावला आहे. परंतु नॉर्थ कोरियानं याबाबत कुठलीही पुष्टी केली नाही. मृतांपैकी कितीजण कोरोनाबाधित होते याबाबत आकडेवारी सांगितली जात नाही.

तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियात बिघडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता आहे. नॉर्थ कोरियात २.६० कोटी लोकसंख्या आहे. यातील बहुतांश जणांचे लसीकरण झाले नाही. यूएन व्हॅक्सिन कार्यक्रमातंर्गत देण्यात येणाऱ्या लसींच्या मदतीलाही नॉर्थ कोरियानं नकार दिला होता. जेणेकरून आंतरराष्ट्रीय तपासणीपासून वाचता यावे. मागील गुरुवारी नॉर्थ कोरियानं पहिल्यांदा कोरोना रुग्ण आढळल्याचं कबूल केले. प्योंगायांग इथं ओमायक्रॉन संक्रमित रुग्ण आढळल्याचं नॉर्थ कोरियानं म्हटलं.

मागील २ वर्षापासून नॉर्थ कोरिया देशात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही असा दावा करत होता. जगात २०२० मध्ये प्रत्येक देशात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. कोरोना वाढता प्रकोप पाहता किम जोंग उननं एक बैठक घेतली. त्यावेळी आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांना किमनं फटकारलं. नॉर्थ कोरियाच्या सरकारी वृत्तानुसार, अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे औषधांचा पुरेसा पुरवठाही झाला नसल्याने किम वैतागले होते. त्यामुळे त्यांनी लष्कराच्या मेडिकल युनिटला औषध पुरवठा करण्याचे आदेश दिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *