फाटक्या ट्यूबमध्ये हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार?; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई – उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी बीकेसीच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राज यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते त्यावर मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने थेट राज ठाकरेंचं नाव घेत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. फाटक्या टय़ूबमध्ये अशी हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.  

शिवसेनेनं सांगितले की, राज ठाकरे(Raj Thackeray) वगैरे नेत्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला असल्याची चपखल उपमा उद्धव ठाकरेंनी दिली. राज ठाकरे यांचे राजकारण भरकटल्याप्रमाणे झाले आहे व भाजप त्यांचा वापर करून घेत आहे. आपल्यात बाळासाहेब ठाकऱ्यांचा संचार झाल्याचा आव आणून ते वागतात. यामागे भाजपची खेळी आहे. फाटक्या टय़ूबमध्ये अशी हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार? असं त्यांनी विचारलं.

तर मुंबईतील शिवसेनेची सभा दिमाखात झाली. शिवसेनेच्या सभांना होणाऱ्या गर्दीची आकडेमोड आजपर्यंत कोणालाच जमली नाही. बीकेसीतील खुल्या मैदानावरील सभेची सुरुवात वांद्रय़ातून होती, तर दुसरे टोक कुर्ल्याच्या पार गेले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील गर्दी पंडितांचीही वाचा गेली आहे. सभेची गर्दी ही फक्त त्या मैदानावरच नव्हती. सभास्थानी लाखो लोक होते, तेवढेच लोक बाहेर अडकून पडले होते व आसपासच्या रस्त्यांवर गर्दीच्या वादळी लाटा जणू उसळत असल्याचे वर्णन प्रसिद्ध झाले ते खरेच आहे. शिवसेना पूर्वीची राहिली नाही, असा अपप्रचार करणाऱ्यांच्या जिभा हा महासागर पाहून टाळूलाच चिकटल्या असतील असा टोलाही शिवसेनेने मनसेला लगावला.

शिवसेनेला कमी लेखण्याचं धाडस अंगलट येईल

भाजपचे पुढारी देशभरात इतरांना ‘बुस्टर’ डोस देत फिरत असतात, पण मुंबईतील शिवसेनेच्या सभेने या मंडळींना जहाल बुस्टर डोस देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला. मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसादी नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अशी हाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा ठाकरे यांनी देऊन भाजपला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे. शिवसेनेला कमी लेखण्याचे व खाली खेचण्याचे धाडस अंगलट येईल, हाच शिवसेनेच्या वादळी सभेचा इशारा आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *