⭕ गावांच्या विकासासाठी चाकरमानी मानसिकता सोडावी लागेल-सुहास खंडागळे
⭕ भडकंबा: बौद्धजन मंडळाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात साजरा
रत्नागिरी : सरपंच त्याच ग्रामपंचायत मध्ये डेटा इन्ट्री ऑपरेटर असताना त्याचे पद रद्द होत नाही अशा आशयाचा निर्णय एका सुनावणी दरम्यान रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिल्याने या निर्णयामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो,त्याच बरोबर भविष्यात एखादा सरपंच त्याच ग्रामपंचायत मध्ये डेटा इन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू लागल्यास यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात,हा धोरणात्मक विषय असल्याने व याचा परिणाम ग्रामीण प्रशासकीय कामकाजावर होण्याची शक्यता असल्याने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याची गरज आहे असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी भडकंबा येथे आयोजित बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले.
सोमवारी भडकंबा येथे मौजे भडकंबा बौद्धजन मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष व बुद्धजयंती निमित्त महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गाव विकास समितीचे सुहास खंडागळे उपस्थित होते.ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर चाकरमानी मानसिकता सोडावी लागेल,ग्रामपंचायतच्या माध्यमातून गरजेचे कामे व्हायला हवीत,आवश्यक नसणाऱ्या कामांना आळा घालावा लागेल.ग्रामीण प्रशासनाला जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार माहित असेही सुहास खंडागळे म्हणाले.कोकणात अनेक गावांत ज्या ठिकाणी पाखाडी आवश्यक नसते त्या ठिकाणी सुद्धा पाखाडीवर खर्च केला जातो आणि खऱ्या अर्थाने विकासाची अनेक कामे रखडली जातात असे सांगत शासनाने याबाबतीत धोरण ठरवायला हवे,गावांच्या विकासासाठी कोणत्या मुद्याना प्राधान्य द्यायला हवे हे सरकारच्या चाकोरीबद्ध आराखड्यात न ठरवून देता ग्रामपंचायत व ग्रामस्थांना हे अधिकार द्यावेत असे स्पष्ट मत सुहास खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले.कोकणात उद्योग धंद्यांना होणारा विरोध हा चुकीचा असून तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी विकसित करण्यासाठी सर्व नागरिकांनी शासनावर दबाव निर्माण करायला हवा, गाव विकास समिती या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहे,तालुक्याच्या ठिकाणी रोजगार निर्मिती झाल्यास गावातील स्थलांतर थांबेल.येथील शाळा बंद पडण्याबाबत काहीजण बोलतात पण शाळेत जायला विद्यार्थी नसतील,मुलांचे पालक येथे राहत नसतील तर विद्यार्थी येतील कुठून? याचा विचार आता शासन आणि आपण सर्वांनी करण्याची गरज आहे.नोकरीसाठी होणारे स्थलांतर ही कोकणातील सर्वात मोठी समस्या आहे असे खंडागळे यावेळी म्हणाले.
यावेळी विचारमंचावर मारुतीकाका जोशी,बौद्धजन मंडळाचे अध्यक्ष श्रीराम कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सरचिटणीस राहुल कांबळे, मुंबई अध्यक्ष देवदत्त कांबळे, उपाध्यक्ष राजेश कांबळे, गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,समाजसेवक रामचंद्र नवाले,ग्रा.प.भडकंबा उपसरपंच प्रशांत शिंदे,ग्रा.प.सदस्य केतन दुधाणे,उदय बाईत, महेंद्र मोरे,व तसेच गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी, जिल्हा संघटक मनोज घुग, सदस्य नितीन गोताड, महेंद्र घुग सर, दिनेश गोताड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.