महावितरणची अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी बिले, त्या संदर्भातील महत्त्वाची संपूर्ण माहिती व संघटनेच्या वतीने महत्वाच्या सूचना

महावितरणची अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी बिले, त्या संदर्भातील महत्त्वाची संपूर्ण माहिती व संघटनेच्या वतीने महत्वाच्या सूचना

महावितरणची अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी बिले, त्या संदर्भातील महत्त्वाची संपूर्ण माहिती व संघटनेच्या वतीने महत्वाच्या सूचना


मुंबई दि. २० – राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले महावितरण कंपनीने लागू केली आहेत. यासंबंधी ग्राहकांमध्ये अद्यापही खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांच्या माहितीसाठी, हितासाठी व सोयीसाठी संबंधित सर्व तरतुदी व संघटनेच्या वतीने सूचना जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. आता ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ही रक्कम भरण्यासाठी विनियमामध्ये सहा हप्त्यांची तरतूद केली आहे. तथापि महावितरणने स्वतःच्या सोयीसाठी ही सवलत डावलून हप्ते न देता ग्राहकांनी एकरकमी संपूर्ण रक्कम भरावी अशी मागणी बिले लागू केली होती. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने विनियमातील तरतूद जाहीर केली व एकरकमी भरणा मागणीवर आक्षेप घेतला. त्यानंतर लागलीच कंपनीने ग्राहकांना सहा हप्त्यांत रक्कम भरता येईल असे एसएमएस SMS पाठविण्यास सुरुवात केली आहे. तथापि हे एसएमएस SMS सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोबत दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारे योग्य व आवश्यक तो निर्णय घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

सुरक्षा ठेव आणि प्रीपेड/प्रीपेमेंट मीटर आणि आगाऊ पेमेंट पद्धत याबाबत संबंधित विनियम

विनियम क्रमांक १३ सुरक्षा ठेव –
विनियम क्रमांक १३.२ अंतिम परंतुक –
“परंतु आणखी असे की, पूर्व भरणा केलेले मीटर्स बसवण्या प्रकरणी, वितरण परवानाधारकाकडून सुरक्षा अनामत घेण्यात येणार नाही आणि ग्राहक पूर्व भरणा करण्यासाठी आयोगाने मंजूर केल्याप्रमाणे सूट/ प्रोत्साहन-अधिदान मिळण्यासाठी पात्र राहील.”

【 MERC ने विनियमासोबत जाहीर केलेल्या “कारणांची मीमांसा” मधील वरील विनियमाशी संबंधित माहितीचा पॅरा खालीलप्रमाणे,
10.1.3 विश्लेषण आणि आयोगाचा निर्णय –
सुरक्षा ठेव रकमेमध्ये बदल करण्याचे कारण स्पष्टपणे खुलासा निवेदनामध्ये, मसुद्याच्या विनियमांसह स्पष्ट केले आहे. शेवटच्या बिलिंग सायकलच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकाने ऊर्जा बिलाचा भरणा करेपर्यंत, २ महिन्यांची सुरक्षा ठेव, वीज वापराचा कालावधी कव्हर करण्यासाठी पुरेशी आहे म्हणून ही वाढ प्रस्तावित केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधितांच्या सूचनांमध्ये तथ्य आढळत नाही. तसेच, प्री-पेड मीटर बसवण्याची निवड करणार्‍या ग्राहकांसाठी, वीज बिल आधी भरले जात असल्याने सुरक्षा ठेवीची गरज नाही. त्यामुळे आयोगाने या संदर्भातील प्रस्तावित विनियमामध्ये कोणताही बदल केलेला नाही.】

विनियम क्रमांक १३.७ –
“सुरक्षा अनामत भरलेल्या ग्राहकाने त्यानंतर जर पूर्व भरणा केलेल्या मीटरद्वारे पुरवठा घेण्याचा पर्याय स्वीकारला तर, अशी सुरक्षा अनामतीची रक्कम, अशा ग्राहकाकडून येणे असलेली सर्व रक्कम वजा केल्यानंतर, अशा ग्राहकास परत करण्यात येईल किंवा अशा ग्राहकाच्या खात्यामध्ये पूर्व भरणा केलेल्या क्रेडिटचा एक भाग म्हणून मानण्यात येईल, ज्यामधून भविष्यातील त्याच्या वीज वापराची रक्कम वजा करण्यात येईल.”

विनियम क्रमांक १६.५ देयकाचा भरणा –
विनियम क्रमांक १६.५.१२ –
“पूर्व भरणा केलेल्या मीटरच्या बाबतीत, परवानाधारक आयोगाच्या संबंधित आदेशांनुसार ग्राहकाला सूट/प्रोत्साहन-अधिदान देईल.” सध्याच्या आयोगाच्या आदेशानुसार वीज आकार व इंधन अधिभार यामध्ये अतिरिक्त ५% सूट उपलब्ध आहे.

विनियम क्रमांक १६.६ आगाऊ भरणा –
विनियम क्रमांक १६.६.१ –
“वितरण परवानाधारक ग्राहकांना पुरवठा केलेल्या वीजेसाठीच्या आकारांचा आगाऊ भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देईल.”

विनियम क्रमांक १६.६.२ –
“वरील विनियम १६.६.२ नुसार आगाऊ भरणा केल्यानंतर, वितरण परवानाधारक आगाऊ म्हणून घेतलेल्या रकमेची ग्राहकाला पोच पावती देईल.”

विनियम क्रमांक १६.६.३ –
“ही व्यवस्था स्वीकारलेल्या ग्राहकाच्या देयकामध्ये, ग्राहकाकडून जमा करण्यात आलेली अनामत रक्कम, प्रत्येक देयक चक्रानंतर समायोजित करण्यात आलेली वीज आकारांची देय रक्कम आणि शिल्लक राहिलेली अनामत रक्कम, दाखविण्यात येईल.”

विनियम क्रमांक १७ – वीजेचा पुरवठा पुर्ववत करणे –
विनियम क्रमांक १७.३ –
“पूर्व भरणा केलेली रक्कम संपल्यानंतर वीज पुरवठा आपोआप खंडित होण्याची व्यवस्था पूर्व भरणा मीटर्स मध्ये करण्यात येईल. तथापि यास पुरवठा खंडित झाल्याचे मानण्यात येणार नाही आणि मीटर जेव्हा रिचार्ज करण्यात येईल तेव्हा पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.”

ग्राहकांना माहिती व मार्गदर्शनपर सूचना —

१. ग्राहकांना शक्य असेल तर अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी रक्कम एकरकमी भरता येईल.
२. ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरणा करण्यासाठी विनियमांनुसार ६ हप्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे ही रक्कम ६ समान मासिक हप्त्यांत भरता येईल. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात अडचण येणार नाही.
३. ज्या ग्राहकांची रक्कम मोठी आहे व कोरोना नंतरच्या आर्थिक अडचणीमुळे रक्कम हप्त्याने भरणेही शक्य नाही, अशा ग्राहकांनी पत्राद्वारे प्रीपेड मीटर पर्यायासाठी अर्ज करावा. प्रीपेड मीटरसाठी सुरक्षा ठेव आवश्यक नाही. तसेच प्रीपेड मीटर ग्राहकांना अतिरिक्त ५% वीज दर सवलत उपलब्ध आहे.
४. कृपया अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित कार्यालयाच्या सही शिक्क्याची पोचपावती घ्यावी.
५. अर्ज केल्यानंतर महावितरण कंपनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीसाठी आग्रह वा सक्ती करु शकत नाही.
६. देयक रक्कम भरण्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हा ग्राहकांचा हक्क आहे. त्यामुळे महावितरण ग्राहकांची कोणत्याही पर्यायाची मागणी नाकारू शकत नाही.
७. आगाऊ पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु ५% वीजदर सवलत मिळणार नाही. तसेच सुरक्षा ठेव किती आवश्यक आहे वा नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे हा पर्याय योग्य नाही.
८. प्रीपेड मीटरसाठी लघुदाब वीज ग्राहकांनी संबंधित विभागाचे (Division) कार्यकारी अभियंता यांचेकडे अर्ज करावा. ऊच्चदाब ग्राहकांनी संबंधित जिल्ह्याचे (मंडल/Circle) अधीक्षक अभियंता यांचेकडे अर्ज करावा.


प्रीपेड मीटरसाठी महावितरणला द्यावयाच्या पत्राचा मसुदा

दिनांक: /05/2022
प्रति,
अधीक्षक अभियंता,
महावितरण, मंडल – ………………………
…………………यांसी

विषय : आपल्या अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीऐवजी प्रीपेड मीटर बसवण्याची विनंती.
ऊच्चदाब HT ग्राहक क्रमांक ……………………

संदर्भ: 1. मासिक बिलासह आपल्याकडून मिळालेली अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी.
2. MERC विद्युत पुरवठा संहिता विनियम 2021 – विनियम क्र. 13.2

मा. महोदय,

MERC पुरवठा संहिता विनियम 2021 नुसार, विनियम क्रमांक 13 अन्वये MSEDCL ला बिलिंग सायकल कालावधीच्या सरासरी बिलिंगच्या दुप्पट सुरक्षा ठेव जमा करण्याची परवानगी मिळालेली आहे. तथापि विनियम क्रमांक 13.2 च्या शेवटच्या परंतुकानुसार, प्रीपेड मीटर बसवल्यास सुरक्षा ठेवीची आवश्यकता नाही. म्हणून आम्ही प्रीपेड मीटरसाठी अर्ज करत आहोत.

सध्या पूर्वीच्या विनियमांनुसार सरासरी एक महिन्याच्या बिलिंग इतकी आमची सुरक्षा ठेव रक्कम महावितरणकडे जमा आहे.

आपल्या मागणीनुसार पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेव देण्याच्या आर्थिक स्थितीत आम्ही नाही. म्हणून आपणास विनंती आहे की कृपया आम्हाला विनियम क्रमांक १३.२ च्या शेवटच्या परंतुकानुसार प्रीपेड मीटर त्वरित बसविणेत यावा.

तसेच आम्‍ही आपल्याला विनंती करीत आहोत की कृपया आमच्‍या विद्यमान सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम प्रीपेड मीटरवर प्रीपेमेंट क्रेडिटसाठी आमच्या खात्यात हस्तांतरित करावी, जेणेकरून कोणतीही अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी होणार नाही. तसेच सध्याच्या MERC टॅरिफ ऑर्डरच्या तरतुदीनुसार आम्ही सर्व प्रोत्साहने आणि 5% टॅरिफ (वीज आकार व इंधन आकार) सवलतीसाठी पात्र राहू.

कृपया वर नमूद केल्याप्रमाणे आम्हाला प्रीपेड मीटर त्वरित प्रदान करावा ही विनंती.

आपला विश्वासू,
………………………

(शिक्का आणि स्वाक्षरी )

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *