अजब नारी की गजब कहानी- लग्न, संसार व प्रेमाचा तिढा ; पोलीसांपुढेही या तिहेरी बेडीचा गुंता

अजब नारी की गजब कहानी- लग्न, संसार व प्रेमाचा तिढा ; पोलीसांपुढेही या तिहेरी बेडीचा गुंता

अजब नारी की गजब कहानी- लग्न, संसार व प्रेमाचा तिढा

पोलीसांपुढेही या तिहेरी बेडीचा गुंता

नागपूरमध्ये एक अजब घटना समोर आली असून एकाच महिलेने दोन पुरुषांशी लग्न आणि तिस-याशी प्रेमसंबंध ठेवल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. आता ती नेमकी कुणाची पत्नी? यावरून तिघांमध्ये वाद सुरू झाला आहे.

एका तरुणीचे वस्तीत राहणा-या युवकावर प्रेम जडले. दोघांनी काही दिवसांच्या ओळखीतच प्रेमविवाह केला. काही वर्षानंतर तिचे मिसकॉल आलेल्या दुस-याच एका युवकाशी सूत जुळले. तिने पहिल्याला सोडून दुस-याशी प्रेमविवाह केला. त्यानंतर काही दिवस जाते नि जाते ती पुन्हा तिस-याच्या प्रेमात पडली आणि तिने तिस-याशीच जीवन प्रवास सुरू केला. प्रेमात दगा मिळाल्याने दुस-या पतीने तिच्या पहिल्या पतीचा शोध घेतला. दोघेही भरोसा सेलला तक्रार करायला आले आणि न्यायाची मागणी करू लागले. त्यांची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.

नागपूरच्या वाठोड्यात राहणारा धीरज हा मिस्त्री आहे. त्यामुळे त्याला कामासाठी कुठेही जावं लागत असे… अशातच मूळची ग्वाल्हेरची ललीता ही आपल्या मोठ्या बहिणीसह कामाच्या शोधात नागपूरात आली. धीरजची ओळख वस्तीत राहणा-या ललीताशी झाली. काही दिवसातच त्या दोघांचे सूत जुळले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी दोन महिन्यातच पळून जाऊन प्रेमविवाह केला आणि संसार उभा कला. त्याच्याकडून तिला एक मुलगाही झाला.

याचदरम्यान, तिला औरंगाबाद येथील पवन या युवकाचा मिसकॉल आला. त्यातून दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. दोघांचाही एकमेकांशी संपर्क वाढला आणि ती पवनच्या प्रेमात पडली. दोघांचे प्रेमसंबंध इतके वाढले की, तिने पवनला नागपूरला बोलावले. त्याला अविवाहित असल्याचे सांगून आपल्या जाळ्यात ओढले. पवनने थेट नागपूरातच काम शोधले आणि तिच्याशी प्रेमविवाह करण्याची तयारी दर्शविली. तिने पती धीरजला गावी जात असल्याचे सांगून पवनसोबत पळ काढला. दोघांनी एका शिवमंदिरात प्रेमविवाह केला आणि सोनेगावात आपला संसार थाटला.

दुसरीकडे धीरज तिच्या विरहात दारू प्यायला लागला. पुढे काही दिवसातच ललीताचे इंस्टाग्रामवरून सचिन नावाच्या युवकाशी सूत जुळले. पवन घरी नसताना सचिन तिच्या घरी यायला लागला. तिच्या प्रेमात सचिन फार वेडा झाला होता. त्याने तिला पळून जाऊन लग्न करण्यासाठी तयार केले. काही दिवस वाट बघून दोघांनीही पळ काढला.

ललीताचा दुसरा पती पवनने पहिला पती धीरजचा शोध घेतला. दोघांनीही पत्नीवर हक्क दाखवत तिला शोधण्याचा प्रयत्न केला. या शोधात ती सचिनसोबत राहत असल्याचे कळाले. त्यामुळे दोघेही पत्नीला मिळविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. त्यांना पोलिसांनी भरोसा सेलला पाठवले.

पहिला म्हणतो माझ्याकडून ललीताला मुलगा आहे, त्यामुळे ती माझी पत्नी आहे. तर दुसरा पती लग्नाचे छायाचित्र, पुरावे आणि साक्षीदारांचे दाखले देऊन ललीता माझीच पत्नी असल्याचे हक्क दाखवतो. पोलिसांनी तिला फोन केला असता ती म्हणते की, माझा जीव तिस-यातच गुंतला आहे. त्यामुळे नेमकी पत्नी कुणाची? या संभ्रमात पोलीसही पडले आहे. अशाप्रकारे या प्रकरणात भरोसा सेलकडून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

   शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
     कमळवेल्ली,यवतमाळ
 भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *