लोकसत्ताकाचे संरक्षण ही आपली जबाबदारी – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

लोकसत्ताकाचे संरक्षण ही आपली जबाबदारी – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

लोकसत्ताकाचे संरक्षण ही आपली जबाबदारी
——-–————————–
प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

हुपरी ता. ६ १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षाच्या स्वातंत्र्य आंदोलनात टिळक आणि गांधी युग हे दोन महत्वाचे कालखंड आहेत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा संदेश लोकमान्य टिळकांनी दिला.गांधीजींनी अहिंसेचे व्रत स्वीकारून, उपोषण व सत्याग्रहाचे सामर्थ्य वापरून, सविनय कायदेभंग करून ,चले जाव व करा अथवा मरा हा आदेश देऊन , तसेच शहिद भगतसिंग यांच्यासह असंख्य शूरवीरांच्या बलिदानाने, असीम त्यागाने स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वतंत्र भारताने स्वतंत्र राज्यघटना तयार केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यासाठी मोठे योगदान दिले. या राज्यघटनेने भारताला लोकसत्ताक म्हणून जाहीर केले. या लोकसत्ताकाने तमाम भारतीयांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याची केलेली प्रतिज्ञा हाच भारतीय स्वातंत्र्याचा मुख्य आशय आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तो आशय जपणे व पुढे नेणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई शांतप्पा शेंडुरे महाविद्यालयात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘ या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.पी.बी.पाटील होत्या. अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.जयवंत इंगळे यांनी प्रास्ताविक केले. रयतचे जनरल बॉडी सदस्य राहुल इंग्रोळे यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांचा भाई माधवराव बागल पुरस्कार मिळल्याबद्दल शाल ,ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याची व्यापक विचारधारा व संविधानाच्या तत्वज्ञानाचा विसर पडू देता कामा नये. मात्र आज त्यालाच आव्हाने दिली जात आहेत.स्वातंत्र्याचा अर्थ स्वतंत्र अथवा दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच असा नसतो.सार्वभौमत्वात
अंतिम सत्ता लोकांची गृहीत आहे.संघराज्यीय एकात्मतेत हे राज्य विविध राज्यांचे मिळून बनले आहे याचे भान ठेवावे लागते. त्यामुळे केंद्र व राज्य संबंध सलोख्याचे असले पाहिजेत. धर्मनिरपेक्षता हा राष्ट्राचा आधार व वारसा आहे.त्यामुळे धर्मराष्ट्राकडे वाटचाल करणे हा परंपराद्रोह आहे. धर्मराष्ट्रामध्ये स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्माचा द्वेष अधिक जोपासला जातो.बहुसंख्यांक वादामध्ये अल्पसंख्यांकांच्या हक्काची कोंडी होणार नाही हे पहावे लागते. समाजवादाचे नाव घेत माफिया भांडवलदारी जर वाढत असेल तर त्याचाही गांभीर्याने मुकाबला करावा लागेल. आणि संसदीय लोकशाहीमध्ये हुकूमशाही पद्धतीने जर मनमानी निर्णय घेतले जात असतील तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. स्वातंत्र्य आंदोलनाची विचारधारा आणि भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान अधिक सकस अधिक लोकाभिमुख करून पुढच्या पिढीकडे सोपवणे हे आपले कर्तव्य आहे. तसे केले तरच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षांमध्ये भारत एक बलशाली देश म्हणून जगात अग्रभागी असेल.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात या विषयाची सविस्तर मांडणी केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलन ,भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आदींचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.एस.एस. बनसोडे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *