इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्यावतीने कर्नाटक बेंदूर सणानिमित्त सालाबादप्रमाणे शतकोत्तर परंपरा असलेल्या ऐतिहासिक लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे शनिवार 11 व रविवार 12 जून रोजी डीकेटीई नारायण मळा येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासो कलागते यांनी दिली. दरम्यान, शर्यतीसाठी मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे व मान्यवरांनी मैदान व तयारीची पाहणी केली.
इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांनी सुरु केलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती कोरोनाचा काळ वगळता अखंडीतपणे सुरु आहेत. इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्यावतीने दरवर्षी या शर्यती घेतल्या जात आहेत. यंदाही कर्नाटक बेंदुर निमित्त 11 व 12 जून असे दोन दिवस नारायण मळ्यातील डिकेटीई शाळेच्या मैदानात शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. लहान गट व मोठा गट अशा दोन गटात ही शर्यत होत आहे. त्याचबरोबर सुट्टा बिनदाती बैल पळविणे शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लहान गटात पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे 75 हजार रुपये शिल्ड व चांदीची फिरती गदा, 51 हजार व 31 हजार अशी बक्षिसे देण्यात येतील. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार व तृतीय क्रमांकासाठी 51 हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. तर सुट्टा बिनदाती बैल पळविणे स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास 15 हजार, द्वितीय क्रमांकास 11 हजार व तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.
त्याचबरोबर मंगळवार 14 जून रोजी ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौक येथे भव्य जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. बुधवार 15 रोजी दुपारी 4 वाजता शाहीर संजय जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आणि सायंकाळी 5 वाजता कर तोडणे व स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
मैदानाची पाहणी करताना ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधासभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नंदु पाटील, शांतिनाथ मगदूम, बाबासो पाटील, मनु हिराणी, संपत जामदार, शिवाजी माळी, राजेंद्र बचाटे, राहुल घाट, नरसिंह पारीक, बंडू जोंग, पप्पु पाटील, सागर कम्मे, गजानन अब्दागिरे, राजू माळी, राजू दरीबे, रमेश पाटील, फरीद मुजावर, रेवनाथ कदम आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन
