महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांचे 1 लाख 12 हजार 789 पेंडिंग अर्ज पंधरा दिवसात निकाली काढावेत. अन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर बांधकाम कामगार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार!.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री शशांक साठे यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बांधकाम कामगार संघटनांची बैठक मुंबई बांद्रा कार्यालयामध्ये तारीख 14 जून रोजी घेतली.
या बैठकीच्या सुरुवातीसच कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, आज महाराष्ट्रामध्ये कल्याणकारी मंडळामार्फत जी ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. ती अत्यंत मंद गतीने सुरू असून राज्यातील एकूणच बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाचे लाभ नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणे कठीण झालेले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 19 लाख 62 हजार 469 इतक्या कामगारांनी लाभ मिळण्यासाठी मंडळाकडे नोंदणी केलेली आहे. त्यापैकी अजून मंडळामार्फत सहा महिने झाले तरी अद्याप अर्ज तपासलेले नाहीत अशा अर्जांची संख्या 1 लाख 12 हजार 789 इतकी आहे. ज्या कामगारांनी ओळखपत्र नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत त्यांची संख्या सात लाख 23 हजार 343 इतकी आहे. त्यातील सुद्धा अजून 38 हजार 225 अर्ज तपासलेले नाहीत. ओळखपत्र जीवित नोंदीत बांधकाम कामगारांनी लाभ मिळण्यासाठी राज्यात सहा लाख 65 हजार 133 इतकी अर्ज केलेले आहेत त्यापैकी एक लाख 63 हजार 472 लाभांचे अर्जअजूनही तपासले नाहीत. वरील सर्व आकडेवारी बैठकीमध्ये सचिव यांनी कामगार संघटनेना दिली.
अशाप्रकारे ऑनलाईन पद्धत महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे अयशस्वी झालेली आहे.विशेष म्हणजे यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याला कल्याणकारी मंडळामार्फत कल्याणकारी योजनांचा निधी पाठवला जात होता व प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या निधीचे वाटप केले जात होते परंतु सध्या हे सर्व काम अत्यंत कमी कर्मचाऱ्यांच्या कडून सध्या मुंबई ऑफिस मधून केले जात आहे.मुंबई कल्याणकारी मंडळाकडे अत्यंत कमी स्टाफ असल्यामुळे त्यांना संपूर्ण राज्यातील कल्याणकारी मंडळाकडे केलेले अर्ज तपासणे अशक्य झालेले आहे. म्हणूनच कामगार संघटनेनी अशी मागणी केली की ताबडतोब प्रत्येक जिल्ह्यामध्ये निधी पाठवून देऊन त्यानुसार वाटप करण्यात यावे. यानुसार पंधरा दिवसात सर्व प्रलंबीत अर्ज निकाली काढावेत. अशी मागणी कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री शशी साठे यांच्याकडे करण्यात आली. याबाबत मंडळाचे सचिव श्री शशांक साठे यांनी यांनी सांगितले की याबाबत मंडळाच्या अध्यक्षांच्या बरोबर म्हणजेच कामगार मंत्री महोदय श्री हसन मुश्रीफ यांच्यावर चर्चा करून या बद्दलचा निर्णय घेण्यात येईल.
याशिवाय बैठकीमध्ये खालील मुद्दे मांडण्यात आले.
एक )मागील एक वर्षापासून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची मुदत संपल्यामुळे हे मंडळच सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे हे मंडळ बिनकामाचे बनलेले आहे. विशेषता सध्या या मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी 13 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. परंतु मंडळच अस्तित्वात नसल्यामुळे सर्व काम ठप्प झाले आहे. म्हणूनच तातडीने हे मंडळ निवडली जावे. अशी मागणी करण्यात आली.
२ )नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला आणि त्याचे वय जर 50 पेक्षा कमी असेल तर त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य योजना असूनही दिले जात नाही हे अन्यायकारक असून याबाबत शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही असे कामगार संघटनेने सचिव यांच्या नजरेस आणून दिले.
३) सध्या बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहास 51 हजार रुपये मिळतात. ते आर्थिक सहाय्य दोन मुलींच्या पर्यंत मिळावे अशी मागणी करण्यात आली.
४) आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीच्या वेळेस पाच हजार रुपये बोनस देण्याचे घोषित केले होते. परंतु या गोष्टींची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून यावर्षी दिवाळीपूर्वीच प्रत्येक नोंदीत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
५) मागील दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील पूर पट्ट्यातील ज्या नोंदीत बांधकाम कामगारांची घरे पडली आहेत अशा कामगारांना प्राधान्याने दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करावी.
मंडळाचे सचिव श्री सुशांत साठे यांनी सांगितले की या सर्व मागण्या संबंधी चर्चा करून संघटनाना त्याबाबत कळविण्यात येईल असे सांगितले.
या महत्त्वाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना फेडरेशन आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉ शंकर पुजारी. निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या (ठाणे जिल्हा)वतीने कॉ रमेश जाधव व पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा सचिव कॉ सुनील पाटील, परभणी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उस्मान शेख, कोल्हापूर जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री सुहास साका व वर्धा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना चे अध्यक्ष श्री उमेश अग्निहोत्री इत्यादी उपस्थित होते.
पंधरा दिवसमध्ये कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनाकडून वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व बांधकाम कामगारांनी जोरदार आंदोलनाची तयारी करावी असे आवाहन करणारे पत्रक सर्व बांधकाम कामगार संघटनांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेले आहे.