डॉ.एन.डी.पाटील महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक, शैक्षणीक,शेतकरी,कष्टकरी,विवेकवादी, परिवर्तन वादी प्रबोधन चळवळीचे अग्रणी होते- प्रसाद माधव कुलकर्णी

डॉ.एन.डी.पाटील  महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक, शैक्षणीक,शेतकरी,कष्टकरी,विवेकवादी, परिवर्तन वादी प्रबोधन चळवळीचे अग्रणी होते- प्रसाद माधव कुलकर्णी

पलूस ता. १७, व्यक्ती ,समाज आणि राष्ट्र हा सक्षमतेचा क्रम बलिष्ठ करण्यासाठी प्रबोधनाची नितांत आवश्यकता असते. समाज जीवनातील बदलानुसार प्रबोधनाचा आकृतिबंध बदलत असतो. प्रा.डॉ.एन.डी.पाटील हे गेली सहा दशके महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,शेतकरी,कष्टकरी,विवेकवादी, परिवर्तन वादी प्रबोधन चळवळीचे अग्रणी होते. महाराष्ट्राला प्रबोधकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. त्या चळवळीतील ‘प्रबोधकांचे प्रबोधक ‘ म्हणून प्रा.डॉ.एन.डी.पाटील सरांचे फार मोठे योगदान आहे. यांच्या विचारांवर निष्ठापूर्वक वाटचाल करणे ही महाराष्ट्राच्या वर्तमान प्रबोधन चळवळीची गरज आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (रामानंदनगर ) येथे प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या पाचव्या मासिक स्मृतीदिना निमित्त आयोजित व्याख्यानात ‘ प्रा. डॉ. एन. डी. पाटील व प्रबोधन चळवळ ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एल.डी. कदम होते.मंचावर व्ही.वाय.पाटील,उपप्राचार्य टी.एस.भोसले,प्रा.काकासाहेब भोसले,प्रा.खोत होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.तेजस चव्हाण यांनी केले.प्रा.बबन पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, प्रा.डॉ.एन.डी.पाटील, डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,डॉ.एन.डी.पाटील यांच्या विचारांवर छत्रपती शिवाजी महाराज,कार्ल मार्क्स,, महात्मा फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे ,कर्मवीर भाऊराव पाटील,संत गाडगेबाबा आदींचा मोठा प्रभाव होता. या विचार परंपरेने समाजातील शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा विचार केलेला आहे.एन.डी.सरांनी त्याच धाग्याची वीण समकालीन प्रश्नांसोबत अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले.मार्क्सच्या परिभाषेत राजकारणाच्या व समाजकारणाच्या क्षेत्रात ‘तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य ‘असता कामा नये असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यानी सैद्धांतिक प्रबोधन करणाऱ्या समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेत आचार्य शांताराम गरुड,शहीद गोविंद पानसरे आदींसह हिरीरीने पुढाकार घेतला. आणि त्या कार्यात ते अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्था,अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी अशा अनेक संस्थांचे नेतृत्व त्यांनी केले.एन.डी. सरांच्या सर्व राजकारणाला, समाजकारणाला, लढ्याला, आंदोलनाला, प्रबोधनाचे व्यापकअधिष्ठान होते. त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द आणि लिहिलेले प्रत्येक वाक्य हा महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचा अनमोल ठेवा आहे. तो ठेवा अंगीकृत करून ,स्वतः प्रबोधित होऊन प्रबोधन करत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.एल.डी.कदम म्हणाले, साधी राहणी व उच्च विचारसरणी हे एन.डी.साहेबांचे वैशिष्ट्ये होते. त्यांनी समाजाकडून घेण्यापेक्षा समाजाला देण्याची शिकवण आपल्याला दिली आहे .त्यांची ही विचारधारा पुढे घेऊन पुढे जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रा.डॉ.एन.डी. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेतील हे व्याख्यान आयोजित केले होते.आभार प्रा. दिलीप कोने यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. स्वाती मगदूम यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *