असे “का, का?” वागले!
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
मुंबईसह राज्यभर मुसळधार पावसामुळे थैमान घातले आहे. राज्यातील काही जिल्हात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पंधरा तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीने राज्यातील पुरपरिस्थीतीवर लक्ष ठेवून आहेत. संबंधित अधिकारी वर्ग प्रशासनाला ही त्यांनी जागृत राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मुंबई महानगर पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली व तेथील कामकाजाची माहिती दिली.
मुंबईती महानगरपालिके मधील आपत्ती कक्षाचा विचार केला तर माजी पर्यावरण मंत्री युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले व त्यांच्या अधिपत्याखाली तयार झालेले कक्ष. मुंबई महानगर पालिका गेली पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. अनेक “अर्थ” पुर्ण घडामोडी पालिकेच्या मार्फत होत असतात. मुंबईती अनेक विकासाची कामे ज्या कामाशी प्रत्यक्ष सर्व सामान्य जनतेशी संबंध असतो ती महापालिकेतूनच नगरसेवकांमार्फत होत असतात. यामुळेच भविष्यातील पक्ष वाढीसाठी व सत्तेच्या समीकरणासाठी मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतल्यावर शिवसेनेचे शाखा प्रमुख व शिवसैनिकांनी सुध्दा एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. मुंबई शहरातील पालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे साहेबांचे वर्चस्व असणार यात शंका नाही. असे असले तरी मुंबई महानगर पालिका आपत्ती निवारण कक्षाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री साहेबांनी केली व एकप्रकारे आदित्य ठाकरे यांच्या कार्याची पोचपावती दिली आहे. दादर हिंदमाता, मिलन सब वे, अंधेरी येथील सब वे मधील पाण्याचा निचरा करण्यात पालिका प्रशासनला यश मिळाले आहे. जनजीवन विस्कळीत न होता मुसळधार पावसातही बहुतांश व्यवहार सुरळीत चालू होते याचे श्रेयही मुख्यमंत्री प्रशासनाला देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळात असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या विभागाच्या बैठकी घेत असत अनेक फाईलींबाबत युवा सेनेचे वर्चस्व लादले जात असे अशाप्रकारचे आक्षेप खुद्द एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले असताना सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांची भूमिका मवाळ का? चौदा आमदारांच्या यादी मध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना का वगळण्यात आले आहे? याची उत्तरे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेत एकनाथ शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राऊत हे पहिल्यापासून होते. एकनाथ शिंदे आदित्यजीच्या अत्यंत जवळचे नेते होते. युवा सेना टिमला ते नेहमीच मार्गदर्शन करत असायचे. आदित्यजींच्या जवळचे शिंदे काका यामुळेच आदित्यवर प्रेम दाखवत आहेत का? की प्रेमाने रामदास कदम पुत्र आमदार योगेश कदम यांच्याप्रमाणे युवा सैनिकांना जवळ करुन आपल्या तंबूत आणण्यासाठी खेळ खेळत आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.