सांगली जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन मिळाले पाहिजे यासाठी जोरदार आंदोलन!
महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने १२ ऑगस्ट रोजी ठीक दुपारी एक वाजता सांगली जिल्हा परिषदेसमोर प्रचंड संख्येने आशा व गटप्रवर्तक महिलांनी एकत्र येऊन सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत दरमहा आशा व गट प्रवर्तक महिलांना दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी श्री दिलीप माने यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली की मागील चार महिन्यापासून आशा व गटप्रवर्तकांना सध्या लागू असलेले वेतन सुद्धा मिळालेले नाही. याबाबत दिलीप माने यांनी असा खुलासा केला की त्याबाबतच्या बिलावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांनी सही केलेली आहे. लवकरच राज्याकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येईल. ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्या कामाची सक्ती आशांच्यावर केली जाते ती थांबवावी अशी मागणी केली असता ,याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये असा प्रकार घडत असेल त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करावा समस्या सोडवण्यात येईल.
राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणी लागू केलेली आहे परंतु गटप्रवर्तक महिला राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असून सुद्धा त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन व नियम लागू केले जात नाहीत ते ताबडतोब लागू केले पाहिजेत. अशी मागणी आहे.आशा व गटप्रवर्तक महिलांना दिवाळीच्या पूर्वी भाऊबीज म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना स्कुटी व अँड्रॉइड मोबाईल मिळाला पाहिजे.आशा व गटप्रोधक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे. असा दर्जा मिळेपर्यंत दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. या मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे पाठवून देण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आश्वासन दिले.
यानंतर जिल्हा परिषद समोर मोर्चा समोर झालेल्या मीटिंगमध्ये महाराष्ट आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सहसचिव प्रा. शरयू विशाल बडवे यांनी सांगितले की,
सध्याचे वर्ष अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात आहे .अशा वेळेस मागील सतरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये 60000 आशा व गटप्रवर्तक महिला काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाने अजूनही कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही.
विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये 29 हजार पदे रिक्त आहेत. म्हणूनच आशा व गटप्रवर्तक महिलांना नोकरीत कायम केले पाहिजे.जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी आपली संघटना मजबूत केली पाहिजे. त्याशिवाय आपले कुठलेच हक्क आपल्याला मिळवून घेता येणार नाहीत. म्हणून या पुढील आंदोलनाची त्यांनी तयारी करावी असे त्यांनी आवाहन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी प्रा. शरयू बडवे, कॉ विद्या कांबळे, मोनाली अर्जुन, भारती चौगुले, रेखा परीट, माया जाधव, प्रा. शरयू बडवे, सुवर्णा सातपुते, राधिका राजमाने, सारिका माने व उज्वला पाटील इत्यादींनी केले.
Posted inसांगली
सांगली जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन मिळाले पाहिजे यासाठी जोरदार आंदोलन!
