एक संवाद गझलेशी : सराय कलादालनात बहारदार मैफल

एक संवाद गझलेशी : सराय कलादालनात बहारदार मैफल


एक संवाद गझलेशी : सराय कलादालनात बहारदार मैफल

कोल्हापूर ता.१६ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सराय कलादालन यांच्यावतीने आणि गझलसादच्या सहकार्याने ‘एक संवाद गझलेशी’ हा गझलांचा मुशायरा आणि गझल या काव्य प्रकाराची ओळख करून घेणारा हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभीर सराई संस्थेचे मिलिंद रणदिवे आणि सिकंदर नदाफ यांनी सर्व गझलकारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. ज्येष्ठ रंगकर्मी अनिल सडोलीकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने उ’ ज्येष्ठ रंगकर्मी ‘ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गझलसादचे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गझलकार प्रसाद कुलकर्णी, प्रा.नरहर कुलकर्णी ,डॉ. सुनंदा शेळके, प्रवीण पुजारी ,डॉ. दयानंद काळे , सीमा पाटील, जमीर शेरखान ,अनंत चौगुले, किरण मिस्त्री आपल्या विविध रंगाच्या व ढंगाच्या गझला सादर केल्या. डॉ. योगिनी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम सूत्रसंचालन केले. तसेच गझल या काव्यप्रकार, त्याची वैशिठ्ये,सुरेश भट यांच्याविषयी ज्येष्ठ गझलकारांना बोलते केले.

या मुशायऱ्यात डॉ. सुनंदा शेळके यांनी’ जोवर इथे उगवतील हे चंद्र सूर्य तारे ,’स्वातंत्र्य ‘शब्द घेऊन हे वाहतील वारे ‘ अशा शब्दात स्वातंत्र्याची चिरायूता स्पष्ट केली.’प्रा.नरहर कुलकर्णी यांनी’ देश तो माझा असे ज्याचे असे गुणगान आहे,वेगळाले सूर असुनी एक ज्याची तान आहे ‘या शब्दात विविधतेतील भारतीय एकात्मतेचा जागर केला.’ त्या विरांच्या पायवाटा मातीत या मुजल्या कशा ?त्या नरांच्या वज्रस्मृती वाटेतही भिजल्या कशा ? असा प्रश्न अनंत चौगुले यांनी मांडला.’ रंग जिथे जातींचा भगवा ,निळा न हिरवा ,अर्थ तिथे माणसांच्या रक्ताचा कळतच नाही ‘ अशी वेदना किरण मिस्त्री यांनी व्यक्त केली.

‘वेळोवेळी ज्यांनी ज्यांनी जाण्यास पुढे सदा टोकले,तेच खरे तर योग्य मार्ग मज दाखवणारे मला वाटले ‘ या शब्दात प्रवीण पुजारी यांनी मार्गदर्शकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.डॉ. दयानंद काळे यांनी’ वेदनेस रिझवायला दुःख सजवतो आहे, मी रोज इथे गझलेच्या कैफात झिंगतो आहे ‘ या शब्दात जीवनाची गझलमयता दाखवली.’ चाफा तुझ्या स्मृतींचा उमलून येत नाही ,गेला ऋतू फुलांचा परतून येत नाही ‘ या शब्दात सीमा पाटील यांनी आठवांना साद घातली. जमीर रेंदाळकर यांनी ‘ कितीदा करू व्यक्त मी भावनांना ,कधीतरी तिलाही कळावेत डोळे ‘या शब्दात हळुवार अपेक्षा व्यक्त केली.प्रसाद कुलकर्णी यांनी ‘ भारतभूच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली, त्या मूल्यांचे रक्षण करण्या वाटत जाऊ विचार ढाली ‘ हा संदेश दिला.

या कार्यक्रमास डॉ. अनमोल कोठाडिया, नीरज कुलकर्णी, सुभाष वाणी ,अनिल मंडलिक,सानिका माळी, सुनील पवार, मेघ रणदिवे ,सुरेश श्रीखंडे ,अविनाश शिरगावकर ,ज्ञानेश्वर डोईफोडे, बाळकृष्ण पाटील, शरदचंद्र मोघे, राजेंद्र राऊत, मिलिंद कुलकर्णी ,पुंडलिक कांबळे, दामोदर यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील कलावंत व रसिक उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *