गंभीर प्रकरणातील आरोपींची सुटका व स्वागत निषेधार्ह

गंभीर प्रकरणातील आरोपींची सुटका व स्वागत निषेधार्ह

गंभीर प्रकरणातील आरोपींची सुटका व स्वागत निषेधार्ह

इचलकरंजी ता. २२, वीस वर्षापूर्वीच्या गुजरात दंगलीमध्ये बिल्किस बानो या गर्भवती महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार ,त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीची जमिनीवर आपटून केलेली हत्या आणि अन्य चौदा जणांचे केलेले खून या प्रकरणी आरोपी असलेल्या अकरा जणांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २००८ मध्ये आजन्म करावासाची शिक्षा ठोठावली होती. आरोपींचे हे कृत्य अत्यंत अमानवी,हिंस्त्र स्वरूपाचे होते.मात्र या आरोपींना गुजरात सरकारने मुक्तता धोरणाच्या पळवाटीचा फायदा घेऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा दिवशी तुरुंगातून मुक्त केले. त्यांच्या बलात्कारी व खुनशी स्व -तंत्राला अशी दिलेली मान्यता ही अतिशय गंभीर व निषेधार्थ बाब आहे. तसेच या मंडळींचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पेढे वाटून ,पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करणे हे तर अतिशय लांचनास्पद आहे ,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. या चर्चासत्राची सुरुवात प्रा.रमेश लवटे यांनी केली. तर समारोप तुकाराम अपराध यांनी केला. यावेळी जेष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांची दै. लोकसत्ताच्या “प्रिन्सिपल कॉरसपौंडन्ट ” पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राहुल खंजिरे यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
या चर्चासत्रात बिल्किस बानो प्रकरणासह २००२ ची गुजरातची दंगल,त्यावरील माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांची प्रतिक्रिया, त्या दंगलीचे भीषण परिणाम,वाढती धर्मांधता, बदलते राजकारण व त्याचे धोके ,स्वायत्त संस्थांचा मोकाटपणे सुरू असलेला वापर, भारतीय ऐक्य परंपरा, संविधानाशी बांधिलकी ,त्याच्या तत्वांशी केली जात असलेली छेडछाड,सत्ताधारी व विरोधी पक्षांचे राजकारण,माध्यमांची भूमिका आदी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.तसेच रुपकंवरला सती घालवणे व तेथे लोकप्रतिनिधी हजर असणे,फादर स्टेनस व त्यांच्या मुलांना जिवंत जाळणे व उन्नाव,कथुआ,हाथरस आदी ठिकाणी झालेल्या घटनांबाबत महिलावर्गाबद्दल घेतलेली भूमिका याबाबतही चर्चा झाली.अशावेळी संवैधानिक मूल्यांवर आधारित देशाची वाटचाल झाली पाहिजे. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीच कटिबद्ध झाले पाहिजे ,असे मत व्यक्त करण्यात आले. या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, राहुल खंजिरे,दयानंद लिपारे,राजन मुठाणे,डी.एस.डोणे,देवदत्त कुंभार,सचिन पाटोळे,पांडुरंग पिसे,शकील मुल्ला,मनोहर जोशी,सत्वशील हळदकर,अशोक माने आदींनी सहभाग घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *