धडे बाप्पाचे एकविस मार्ग यशाचे
मुलाखतकार शेरास उमेदवार सव्वाशेर
पुण्यातील एका बॅंकेत मुलाखतीसाठी देशभरातून उमेदवार आले होते. पुण्यातील चतुरानंदही त्यात होता. आपणापैकी ब-याच लोकांना मुलाखतीचा अनुभव आहे. त्यामुळे मुलाखतीला कसं सामोरे जावं लागतं, हे आपणास चांगलच माहित आहे. त्याला अनुसरूनच पुण्यातील चतुरानंद नामक उमेदवार अगदी आपल्या नावाप्रमाणेच कशाप्रकारे मुलाखतीला सामोरे गेला? याचं कल्पनाचित्र आपल्यापुढे सादर!
मुलाखतकार : तुमचं संपूर्ण नाव सांगा.
चतुरानंद : (खेकसत) तुम्हाला कळत नाही का? मी कामात आहे. चार नंबरच्या खिडकीत चौकशी करा.
मुलाखतकार (संयम ठेवत) : तुम्ही मुलाखतीसाठी आला असल्याने स्वतःचे नाव सांगणे अत्यावश्यक आहे.
चतुरानंद : मुलाखतीची तयारी फक्त उमेदवारानेच करायची असते का? आपण ज्याची मुलाखत घेणार आहोत, त्याचं नाव-गाव आधीच माहिती करून घेता येत नाही का? माझी संपूर्ण माहिती अर्जात आहे. तेवढी वाचायची तसदीसुद्धा आपण घेत नाही. माणसानं एवढंही आळशी नसावं. तुमच्यासारख्या लोकांमुळेच देशाची आर्थिक परिस्थिती बिघडलीय.
मुलाखतकार : तुमच्या या उद्धटपणामुळे ही नोकरी तुम्हाला मिळेल, असं वाटते का?
चतुरानंद : हा उद्धटपणा नाही. याला स्पष्टवक्तेपणा म्हणतात आणि तो आमच्या रक्तातच आहे. तुमच्या बॅंकेत नोकरीला लागल्यानंतर ग्राहकांशी उद्धटपणे कसे वागावे? याचं प्रशिक्षण तुम्ही देता. असा खर्च करण्यापेक्षा आमच्यासारख्या ओरिजनल स्पष्टवक्तेपणा असलेल्या माणसाला नोकरी देणं, बँकेला केव्हाही फायद्याचं आहे.
मुलाखतकार : आमच्या बॅंकेच्या अटी व नियम तुम्हाला माहिती असतीलच, असे मी गृहित धरतो.
चतुरानंद : हे बघा! कोणालाही असं गृहित धरणं, एकदम चुकीचं आहे. काही महिन्यांपूर्वी माझी प्रेयसी मला गृहित धरून, वागायला लागली. त्यावेळी तीनवेळा तिला लेखी व तोंडी समज देऊन समजावले. त्यानंतरही तिने ऐकले नाही. त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं. मी एकवेळ अविवाहित राहीन पण माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही.
मुलाखतकार : बरं मी बॅंकेचे अटी व नियम सांगू का?
चतुरानंद : काही गरज नाही, पण तुमच्या बॅंकेत नोकरी करताना माझ्याही काही अटी व नियम आहेत. पहिली अट म्हणजे माझ्या हातून काही चूक झाली तरी वरिष्ठांनी माझा अपमान करायचा नाही. अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. दुसरी अट प्रमोशन वा पगारवाढीसाठी मी कोणाच्याही पुढे-पुढे करणार नाही. या गोष्टी आपोआप मिळाव्यात. असं म्हणून अटी व शर्तींची यादी त्याने मुलाखत घेणा-याला दिली.
मुलाखतकार : ग्राहकांची भलीमोठी रांग लागल्यावर तुम्ही काय कराल?
चतुरानंद : ‘लंच ब्रेक’, ‘सिस्टीम हॅंग,’ किंवा ‘सर्वर डाऊन’ असा बोर्ड लावेन आणि संगणकावर किंवा मोबाईलवर गेम खेळत बसेन.
मुलाखतकार : डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी आलेला ग्राहक चुकून भलत्याच रांगेत आल्यावर तुम्ही त्याच्याशी कसं वागाल?
चतुरानंद : आधी मी कपाळावर आठ्याचं जाळं पसरणार. नंतर त्याच्यावर चांगलं खेकसणार. यानंतर त्याला तीन-चार खिडक्या फिरवून यायला लावणार. तुम्हाला वाचता येत नाही का? रांगेत उभं राहण्यापूर्वी खात्री करता येत नाही का? असं खेकसणार.
मुलाखतकार : एखादी व्यक्ती मोठमोठ्या व्यक्तींची नावे सांगून काम करण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकत असेल तर तुम्ही परिस्थिती कशी हाताळणार?
चतुरानंद : त्यांच्याशी मी हसून बोलणार. साहेब बाहेर गेले आहेत, त्यांची सही व्हायची आहे, असे सांगून तीन-चार तास थांबवून ठेवणार. त्यानंतर उद्या या, असे सांगून आठवडाभर हेलपाटे मारायला लावणार. ते काम किरकोळ असलं तरी नियमांच्या जंजाळात अडकवणार. त्यांनी गयावया करेपर्यंत कामाला हात लावणार नाही. आयुष्यभर तो कोणावर दबाव टाकणार नाही, असा धडा शिकवणार.
मुलाखतकार : तुम्ही आमच्या बॅंकेसाठी योग्य आहात. तुम्ही उद्यापासून कामावर या.
चतुरानंद : एवढ्या तातडीने मी कोणतंही काम करत नसतो. त्यामुळे माझ्या सवडीने पुढच्या महिन्यात जॉईन होईल. बरं मी येऊ का? मलाही आज पाच- सहा मुलाखती घ्यायच्या आहेत.
मुलाखतकार : तुम्ही कोणाच्या मुलाखती घेणार आहात?
चतुरानंद : अहो! आताच सांगितलं नाही का, माझं ब्रेकअप झालंय. त्यामुळे नवीन प्रेयसीसाठी अर्ज मागवले होते. त्यांच्याच मुलाखती घ्यायच्या आहेत. आज मुलाखत घेऊन लगेचच लेटर देणार म्हणजे लव्हलेटर हो! असं म्हणत चतुरानंद त्यांच्या परवानगीची वाट न पाहता निघून गेला.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९