अद्भुत अनुभूती!” गणरायांच्या दर्शनानंतर महावाणिज्य दूतांनी व्यक्त केली प्रतिक्रिया विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

अद्भुत अनुभूती!” गणरायांच्या दर्शनानंतर महावाणिज्य दूतांनी व्यक्त केली प्रतिक्रिया विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

“अद्भुत अनुभूती!” गणरायांच्या दर्शनानंतर

महावाणिज्य दूतांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतींचे दर्शन

        मुंबई, दि. 2 : विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून "अद्भुत अनुभूती" आल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

        पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने आज महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घडवून आणण्यात आले. लालबाग येथील गणेश गल्लीच्या गणपतीजवळ श्री.लोढा यांनी महावाणिज्य दूतांचे स्वागत करून त्यांना भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या महाराष्ट्रातील वैभवशाली परंपरेची ओळख करून दिली. या उत्सवाची जगात सर्वत्र ओळख होऊन त्याचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने महावाणिज्य दूतांना गणरायांचे दर्शन घडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाखो भाविक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि हा जगभरातील सर्वात मोठा उत्सव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आदी उपस्थित होते.

        कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावर्षी राज्यात हा सण पुन्हा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत देशाबाहेरही मोठे आकर्षण असल्याने मंत्री श्री.लोढा यांच्या संकल्पनेतून विविध देशांच्या महावाणिज्य दूतांना या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक परंपरेची ओळख करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत आज पहिल्या टप्प्यात दहा देशांचे महावाणिज्य दूत सहभागी झाले होते.

        यामध्ये इस्रायलचे कोब्बी शोशानी, स्वित्झर्लंडचे मार्टिन मायेर, अर्जेंटिनाचे गिलरमो दिवोटो, बेलारूसचे अँटोन पोस्कोव, बांगलादेशचे चिरंजीब सरकार, ऑस्ट्रेलियाचे पिटर ट्रुस्वेल, पोलंडचे दामियन इरझ्यक, श्रीलंकाचे वलसान वेथोडी आणि इंडोनेशियाच्या महावाणिज्य दूतांचा तर ब्रिटनच्या डेप्युटी हेड ऑफ मिशन कॅथरीन बार्न्स यांचा समावेश होता. त्यांनी आज माटुंगा येथील सुवर्ण गणेश अशी ओळख असलेल्या जीएसबी गणेश मंडळ, लालबाग येथील गणेश गल्ली आणि लालबागचा राजा तसेच गिरगावच्या सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील गणेशांचे दर्शन घेतले. सर्व गणेश मंडळांच्यावतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांना या उत्सवाबाबत माहिती देण्यात आली.

        व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी प्रथम गुरूनानक खालसा महाविद्यालय येथे आयोजित समारंभात महावाणिज्य दूतांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना महाराष्ट्रातील गणेशोत्सवाबद्दल माहिती दिली. महावाणिज्य दूतांनी आपल्या देशात या उत्सवाचा प्रसार करावा जेणेकरून हा उत्सव जगभर पोहोचून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक महाराष्ट्रातील येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *