‘गझल प्रेमऋतूची ‘ ला सांडू प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा ‘प्रथम’पुरस्कार जाहीर
इचलकरंजी ता. ६ ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी आणि प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांच्या ” गझल प्रेमऋतूची ” या गझलसंग्रहाला ‘दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, चेंबूर, मुंबई ‘ या संस्थेचा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी साहित्य विश्वात या पुरस्काराची प्रतिष्ठित पुरस्कारात गणना केली जाते.दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानच्या वतीने गेली बारा वर्षे प्रतिवर्षी कविता, कथा, कादंबरी ,ललित, बालसाहित्य आदी साहित्य प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना ‘ साहित्य पुरस्कार ‘ देऊन गौरवले जाते. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या दोन वर्षातील पुस्तकांचे एकत्रित परीक्षण करून यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच हा पुरस्कार वितरण सोहळा दिवाळीनंतर होईल अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने आनंद श्रीधर सांडू आणि माधुरी म.शिंदे यांनी दिली.
” गझल प्रेमऋतूची ” हा गझलनंदा व प्रसाद कुलकर्णी यांचा संयुक्त गझल संग्रह २७ डिसेंबर २०२१ रोजी ख्यातनाम उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या २२५ व्या जन्मवर्षाच्या प्रारंभदिनी इचलकरंजी येथे ‘जीनियस ऑफ गालिब ‘ समूहाच्या वतीने आयोजित प्रकाशन समारंभात प्रकाशित करण्यात आला होता. मराठी गझल क्षेत्रात अनेक वैशिष्ट्यानी युक्त असलेला हा गझलसंग्रह गझलविश्वात अतिशय लोकप्रिय ठरला आहे. या संग्रहाला कोल्हापूर ,ठाणे, अहमदनगर आदी विविध भागातील पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.आता दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा ‘प्रथम ‘ पुरस्कारही जाहीर झाला आहे याचा विशेष आनंद आहे अशी प्रतिक्रिया गझलकार प्रसाद कुलकर्णी व प्रा.सुनंदा पाटील यांनी दिली आहे.